पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या नेत्या, कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड भेद रणनितीनुसार चालण्याचे आवाहन करत आहेत. आपल्याला प्रचंड मोठी लढाई लढायची असून कोणी आपल्या अस्तित्वाला आव्हान देत असेल, विश्वासघात करत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे असे सांगत आहेत.

आपल्याला मोठा अॅटॅक केला पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्यामागे ताकतीने खंबीरपणे उभा आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड झाल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. भाजपा या ऑडिओ क्लिपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोनसभा पालघरमध्ये होणार असून ते या आरोपांना कसे उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

आज सकाळीच पालघरमध्ये पैसे वाटपाचे नवीन प्रकरण समोर आले आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमित घौडा आणि काही शिवसैनिकांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील रानशेत भागातून पैसे वाटप करणाऱ्या काही तरुणांना पकडले. दरम्यान शिवसेनेने या पैसे वाटपामागे भाजपा असल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणावरुन पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगण्याची शक्यता आहे.