मुंबईतील पाली हिल परीसरातील रस्त्यांवर आता कचऱ्यामुळे प्रकाश पडणार आहे. कचरा आणि इतर टाकाऊ गोष्टींमधून ऊर्जा निर्माण करून त्यापासून या परिसरातील पथदिव्यांना ऊर्जा पुरवण्यात येणार आहे. ‘शून्य कचरा परिसरा’चे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवत वांद्रे येथील पाली हिल रेसिडन्ट्स असोसिएशन या संघटनेने रविवारी हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील ६८ पथदिव्यांना ऊर्जा मिळणार आहे. या परिसरात ७८ इमारती आणि २३ बंगले आहेत. त्यापैकी काही बंगले हे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, गीतकार गुलजार यांसारख्या प्रसिद्ध लोकांचे आहेत. अशा उच्चभ्रू वस्तीत कचऱ्यापासून पथदिवे पेटणार असल्याने या गोष्टीची जास्त चर्चा आहे.

या प्रकल्पासाठी १०० चौरस फूट इतकीच जागा आवश्यक होती. त्यासाठी जागा शोधणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र, या प्रकल्पासाठी जमीन मिळवून देण्याच्या प्रक्रियेत पालिका प्रशासन, स्थानिक नेतेमंडळी आणि आमदार, खासदारांनी सहकार्य केले, असे संघटनेच्या सचिवांनी सांगितले. तसेच, या प्रकल्पाची यंत्रणा ही वाराणसी येथील प्रकल्पासारखीच आहे. या प्रकल्पासाठी एप्रिल २०१६पासून काम सुरू होते आणि फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक अपेक्षित होती. त्यामुळे कंपन्यांकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबीलिटी संकल्पनेअंतर्गत आर्थिक मदत घ्यावी लागली, अशी माहितीही त्यांनी दिली.

या प्रकल्पासाठी रहिवाशांकडून ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात होता. या प्रकल्पाची चाचणी करण्यात आली आहे आणि ही चाचणी यशस्वीदेखील ठरली, असेही त्यांनी सांगितले. तर आपल्या अधिकारक्षेत्रात असलेला हा पहिला परिसर कचरामुक्त झाल्याचे वॉर्ड अधिकाऱ्याने सांगितले.