रुग्णालयीन वेळेत खासगी सेवा दिल्यास बडगा; शहरातील ११० नर्सिग होम्सनाही पालिकेचा इशारा

पालिका रुग्णालयांच्या कामाच्या वेळेत हजेरीकरिता केवळ ‘अंगठे’ लावून थेट खासगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने आता कंबर कसली आहे. दुसरीकडे सकाळी ९ ते ४ या वेळेत खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेच्या डॉक्टरांनी सेवा दिल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिकेने शहरातील ११० खासगी नर्सिग होम्सना पत्राद्वारे दिला आहे.

पालिका रुग्णालयांतील डॉक्टरांना सकाळी ९ ते ४ या वेळेव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये सेवा देण्याची मुभा आहे. यासाठी डॉक्टरांनी तसे पालिकेला लेखी कळवणे आवश्यक आहे. मात्र याचा गैरफायदा घेत अनेक वरिष्ठ डॉक्टर सकाळी बायोमेट्रिक हजेरी यंत्राद्वारे हजेरी लावून थेट खासगी वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णालयाबाहेर पडतात. संध्याकाळी पुन्हा चार वाजता ‘अंगठा’ लावण्यासाठी येतात. हे निदर्शनास आल्याने पालिकेने हा कारवाईचा बडगा उगारल्याचे समजते.

शहरातील ११० नर्सिग होम्सना पालिकेने पत्र पाठवले आहे. सकाळी ९ ते ४ या वेळेत पालिकेचे कोणतेही डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार नाहीत, याची खबरदारी रुग्णालय प्रशासनाने घ्यावी. यापलीकडे कोणताही डॉक्टर वेळेचे उल्लंघन करून खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या डॉक्टरचा परवाना रद्द होईल आणि संबंधित खासगी रुग्णालयावरही कारवाई केली जाईल, असे या पत्रात नमूद केले आहे.

काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या एका रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहात झालेल्या शस्त्रक्रियांचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांनी मागवला होता. बहुतांश वरिष्ठ डॉक्टर अनुपस्थित असून कनिष्ठ डॉक्टरांसह पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी शस्त्रक्रिया केल्याचे या अहवालातून उघडकीस आले होते. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शीव येथील लोकमान्य टिळक, केईएम, नायर या रुग्णालयांच्या जवळच काही डॉक्टर खासगी वैद्यकीय सेवा देत असून काही डॉक्टरांचे क्लिनिक तर रुग्णालयाजवळच सुरू आहेत. त्यामुळे पालिका रुग्णालयातून जाणे-येणे सोयीचे असल्याने या डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू होता. बायोमेट्रिक सुविधा आल्यानंतर यावर काही अंशी र्निबध आले होते. मात्र त्यानंतर काही डॉक्टरांनी त्याचाही गैरवापर करण्यास सुरुवात केल्याचेही पुढे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालिकेतील काही डॉक्टर गैरफायदा घेऊन खासगी वैद्यकीय सेवा घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी खासगी नर्सिग होम्सना पत्र पाठविण्याचे आदेश दिले होते. दोन वर्षांपूर्वी एक डॉक्टर अशा रीतीने खासगी वैद्यकीय सेवा देत असल्याने त्याला निलंबित केले होते. नुकताच तो डॉक्टर पुन्हा रुजूही झाला आहे, असे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांकडून स्वागत

पालिकेच्या या निर्णयाचे मात्र पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. यामुळे का होईना आता वरिष्ठ डॉक्टर बाह्य़रुग्ण विभागात उपस्थित असतील. अनेकदा केवळ आमच्यावर सर्व कामे टाकून हे डॉक्टर थेट खासगी वैद्यकीय सेवा देण्यासाठी जात असल्याचे मत पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.