|| शैलजा तिवले
मोतिबिंदूच्या सदोष शस्त्रक्रियेच्या पीडितांना मदतीची प्रतीक्षा; ‘एमआरआय’मध्ये मृत्युमुखी पडलेल्या राजेशच्या कुटुंबाचेही हाल
मुंबई : मोतिबिंदूच्या सदोष शस्त्रक्रियेनंतर एक डोळा तर गेलाच, परंतु पाठोपाठ दुसराही गेला. माझ्या मुलाचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. माझ्यावरच सर्व कुटुंब विसंबून होते. आता मी असा आंधळा बनून घरात बसलोय. बायको कपडे विकते, तर सून घरकामाला जाते. या दोघींच्या जीवावर सर्व जबाबदारी पडली असल्याने माझेच मन मला खात राहते. पालिकेकडून एक पैशाची मदत तर आलेली नाहीच, परंतु आम्ही कसे जगतो हे पाहायला एकही जण बघायला आलेला नाही, असे सांगताना रफिक खान (५९) यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. परंतु आधाराशिवाय उभेही राहता न येणाऱ्या रफिकभाईंकडे राग व्यक्त करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.
भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयातील उद्वाहकाच्या दुर्घटनेत मृत झालेल्या डॉ. अर्नवाझ हवेवाला यांच्या कुटुंबाला घटना घडल्यापासून दहा महिन्यांच्या आत १० लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि त्यांच्या मुलीला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या दंत विभागात हाऊस ऑफिसर या पदावर पालिकेने रुजू केले आहे. मात्र पालिका रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांमध्ये भरडलेली अनेक कुटुंबे अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पालिकेच्या दुटप्पी धोरणाविषयी या नातेवाईकांनी तीव्र निषेध व्यक्त करत आमच्याविषयी पालिकेला सहानुभूती वाटत नाही का असा सवाल उपस्थित केला आहे.
बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील सदोष मोतिबिंदू शस्त्रक्रियेने रफिक खान (५९), फातिमाबी (८७), गौतम गवाणे (४५) आणि संगीता राजभर(५०) यांची दृष्टी गेली आहे. या घटनेला वर्ष उलटत आले तरी अद्याप त्यांना पालिकेने कोणतीही भरपाई दिलेली नाही. ‘गौतम रिक्षा चालवीत होता. एका डोळ्याची दृष्टी गेल्याने आता त्याला काम करणे शक्य नाही. त्याची बायको शाळेमध्ये साफसफाईचे काम करते आणि दोन मुलांसह कुटुंब चालविते. ती कमी शिकली असली तरी तिला खरी मदतीच गरज आहे’ असे गौतमचे भाऊ सतीश गवाणे यांनी सांगितले.
लोकमान्य टिळक रुग्णालयातील दंत विभागात हाऊस ऑफिसरची जागा आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या गटासाठी राखीव होती. दोन वेळा जाहिरात देऊनही ही जागा भरलेली नाही. आयुक्तांच्या आदेशावरून सहानुभूती तत्त्वावर या पदावर डॉ. हेरा हवेवाला यांना घेतले गेले. या पदासाठी दरमहिना ५४ हजार वेतन असल्याचे नायर दंत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.
‘दुर्घटनाग्रस्तांसाठी नोकरीची किंवा नुकसानभरपाईची तरतूद नाही अशी भूमिका घेत दरवेळेस अंग काढून घेणाऱ्या पालिकेने या कुटुंबाला मात्र तातडीने मदत केली. तिच्या डॉक्टर मुलीला लगेचच नोकरीदेखील दिली. आमच्यासारख्या अशिक्षित आणि गरीबांचा आवाज मात्र पालिकेला का ऐकू जात नाही’ , या शब्दांत एमआरआयमध्ये अडकून मृत्यू झालेल्या राजेश मारू याचे वडील श्यामजी मारू (६९) यांनी पालिकेला जाब विचारला आहे. ‘राजेश हा आमच्या घरचा एकमेव कमावता होता. आता मुलगी दोन घरची धुणीभांडी करते. दोन वर्षे न्यायालयाचे खेटे घालून दहा लाख रुपये आम्हाला मिळाले. त्याचे चार हजार रुपये व्याज येते. आमचे वय झाल्याने सतत दवाखाना मागे असतोच. त्यामुळे यात कसे घर भागवायचं? आमची मुलगी कमी शिकली आहे, परंतु साफसफाईचे तर काम नक्कीच करू शकते. तिला का नाही बरं नोकरी दिली, असा सवाल राजेशची आई गलाल मारू (६४) यांनी केला.
तिने अर्ज केला म्हणून..
नोकरी देण्याचे कोणतेही धोरण पालिकेचे नाही. डॉ. हवेवाला यांनी नोकरीसाठी अर्ज केला होता आणि जागा रिक्त होती. सहानुभूती म्हणून तिला सहा महिन्यांसाठी कंत्राटी पदावर रुजू करून घेतले आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 12:11 am