02 July 2020

News Flash

पालिकेत मराठी भाषेचे वावडे

पालिकेत दरवर्षी मराठी राजभाषादिनानिमित्त मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात येते.

|| प्रसाद रावकर

परिपत्रकाला हरताळ; प्रशासकीय कारभारात इंग्रजी भाषेचाच वापर

मुंबई : प्रशासकीय कामकाजात जाणून-बुजून मराठी भाषेचा वापर टाळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश असताना मुंबई महापालिकेची परिपत्रके, विविध विभागांतर्फे बजावण्यात येणाऱ्या नोटिसा, मोठय़ा प्रकल्पांविषयीचा कारभार इंग्रजी भाषेत करणाऱ्या एकाही अधिकारी वा कर्मचाऱ्यावर आजतागायत कारवाई करण्यात आलेली नाही. किंबहुना स्थायी समितीच्या बैठकीत इंग्रजी भाषेत प्रकल्पांचे सादरीकरण करण्याची मजल अधिकाऱ्यांची झाली आहे. एकीकडे मराठीचा डंगा पिटत असताना पालिकेच्या प्रशासकीय कामकाजात बिनबोभाटपणे इंग्रजी भाषेचा वापर होत असून मराठी भाषेसाठी गळा काढणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेलाही त्याचे सोयरसुतक नाही.

पालिकेत दरवर्षी मराठी राजभाषादिनानिमित्त मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात येते. यंदाही महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली २७ फेब्रुवारीला दुपारी पालिका सभागृहात आयोजित या कार्यक्रमास पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित राहणार आहेत. परंतु, मराठीचे हे गोडवे एका दिवसापुरतेच असतात. पालिकेचा सर्व कारभार मराठी भाषेतच व्हायला हवा ही शिवसेनेची आग्रही भूमिका आहे. मात्र गेली अनेक वर्षे शिवसेना सत्तास्थानी असूनही प्रशासकीय कारभारात इंग्रजी भाषेचा वापर केला जात आहे.

पालिकेची अनेक परिपत्रके, विविध विभागांकडून नागरिकांवर, तसेच नियमभंग करणाऱ्यांवर बजावण्यात येणाऱ्या नोटिसा इंग्रजी भाषेत असतात. मोठय़ा प्रकल्पांविषयीची माहितीही अनेक वेळा मराठीऐवजी इंग्रजी भाषेत दिली जाते. चौकशीचे अहवालही मराठीऐवजी इंग्रजी भाषेत असतात.

पालिकेमध्ये मराठी भाषेचा कमी वापर होत असल्याची तक्रार माहितीचा अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन नगर विकास विभागाने तत्कालीन पालिका आयुक्तांना सूचनावजा पत्रही पाठविले होते. या पत्राची दखल घेत तत्कालीन पालिका आयुक्तांनी १८ नोव्हेंबर २०१४ रोजी परिपत्रक जारी करत प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर करण्याचे आदेश दिले. प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा जाणूनबुजून वापर टाळल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सर्व खाते प्रमुख, साहाय्यक आयुक्तांना परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आले होते. तरीही पालिकेच्या कारभारात वारंवार इंग्रजी भाषेचा वापर होत आहे.

एकाही अधिकारी-कर्मचाऱ्यावर कारवाई नाही

परिपत्रक जारी झाल्यापासून आजतागायत प्रशासकीय कामकाजात इंग्रजीचा वापर करणाऱ्या एकाही अधिकारी वा कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही. उलटपक्षी स्थायी समितीच्या बैठकांमध्ये विविध विषयांवरील सादरीकरणांमध्ये इंग्रजीचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही वेळा स्थायी समितीकडून त्यास आक्षेपही घेण्यात येत आहे. मात्र प्रशासनाने तत्कालीन आयुक्तांच्या परिपत्रकाला हरताळ फासला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 1:17 am

Web Title: palika school marathi use of english language in administrative affairs akp 94
Next Stories
1 बालभारतीतील शैक्षणिक पदे रिक्त
2 विद्यापीठे, महाविद्यालयांमध्येही ‘मराठी भाषा गौरव’ दिन
3 ‘मुंबई श्री’च्या मंचावर अवतरणार पीळदार सौंदर्य; ‘मिस मुंबई’साठी चुरशीची लढत
Just Now!
X