अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांचा सल्ला

प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात. प्रत्येक मूल हुशार असते. मात्र त्याला एखाद्या क्षेत्राची ओढ वाटत नसेल तर तो त्यात यशस्वी होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय आवडते याचा विचार करून करिअर निवडा. आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्याची खात्री अधिक असते, असा मंत्र अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

करिअरच्या महत्त्वाच्या वळणावर असलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रवींद्र नाटय़मंदिर येथे ही कार्यशाळा घेण्यात आली.

आपले पालक आपल्याला चांगलाच सल्ला देतात. मात्र आपले आयुष्य कशाप्रकारे जगायचे हे तुम्ही स्वत:च ठरवायला हवे. आवडीच्या क्षेत्रात अधिक मेहनत करून चांगले यश मिळवता येते. आपल्यातील कमतरता प्रामाणिकपणे स्वीकारा. त्यांच्यावर काम करून त्यात सुधारणा करा आणि स्वत:ला तयार करा. स्वत:चे करिअर झाल्यावर समाजाला विसरू नका, असे मार्गदर्शन दराडे यांनी केले.

पालकांनी मुलांना मानसिक सुरक्षा, आदर, विश्वास आणि प्रेम द्यावे. यातून मुलाला मोकळेपणाने संवाद साधता येतो. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, असे मत मानसोपचारत्ज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी व्यक्त केले. तसेच प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातील टर्निग पॉइंट वेगवेगळ्या टप्प्यावर सापडतो. त्यामुळे अपयश आले म्हणून निराश होऊ नका. पालकांनीही मुलांना त्यांचे करिअर निवडायचे स्वातंत्र्य द्यावे. त्यांच्यावर स्वत:ची स्वप्ने न लादता, अवास्तव अपेक्षा न बाळगता त्याला त्याच्या कलाने जाऊ  द्यावे, असा सल्ला शेट्टी यांनी दिला.

आपल्याला दहावीपर्यंत जे विषय आवडले नाहीत, अवघड गेले असे विषय सोडून देऊन ज्यात आवड होती त्यात त्याला प्रवेश घ्या. करिअर निवडताना आपल्याला काय चांगले येते याचा विचार करा, असे मत विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात अभियांत्रिकी आणि वैद्यकीयबरोबरच इतर पॅरामेडिकल, फिजिओथेरपी, मास कम्युनिकेशन, एनडीए, संरक्षण, संशोधन, कृषी, हॉटेल मॅनेजमेंट, डिझायनिंग, पशुवैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत असलेल्या करिअरच्या संधीबद्दल तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विधि शिक्षणातील विविध संधींबाबत प्रा. नारायण राजाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अमोल अन्नदाते यांनी वैद्यकीय शिक्षणातील संधींची माहिती दिली. तर ‘करिअरच्या वेगळ्या वाटा’ सत्रात डिजिटल कंटेंट क्रिएटर प्रिया आडिवरेकर यांनी या क्षेत्रातील संधींची माहिती दिली, तर शिरीष लाटकर यांनी लेखनातील करिअरबाबत मार्गदर्शन केले. वृत्तवाहिन्यांमधील पत्रकारितेबाबत ‘एबीपी माझा’ वाहिनीच्या पत्रकार ज्ञानदा कदम यांनी मार्गदर्शन केले.

टीव्हीवरील मालिका, चित्रपट, वेबसीरिज यासाठी लिखाण करणे हे शिकण्याचेही तंत्र आहे. त्यासाठी विविध संस्था कार्यशाळा घेतात. त्याचबरोबर एनएसडी, पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये अनेक अभ्यासक्रम आहेत. मात्र हे करताना मेहनत आणि नवीन शिकण्याची तयारी हवी, असे लाटकर यांनी सांगितले.

ज्ञानदा कदम म्हणाल्या की, ज्यांना प्रश्न पडतात, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे अनुभव घ्यायला आवडतात त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात यावे. वृत्तनिवेदक, वार्ताहर याव्यतिरिक्त व्हिडीओ एडिटर, ग्राफिक्स डिझायनर, कंटेन्ट रायटर, साऊंड इंजिनीअर, डिजिटल टीम, प्रोडय़ुसर यातही तुम्ही उत्तम करिअर करू शकता.