अ‍ॅड. पल्लवी पुरकायस्थ हत्याकांड; भेटण्यासाठी मुंबईतही येण्याची तयारी होती

१९९३ बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी मुस्तफा डोसा माझा आदर्श होता. मुंबईत येऊन डोसाला भेटावे, अशी माझी इच्छा होती, अशी धक्कादायक माहिती सज्जादने गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाला दिली आहे.

आर्थर रोड कारागृहात आणि सुनावणीच्या वेळेस न्यायालयात सज्जादची डोसासोबत ओळख झाली होती. आईने घातलेली शपथ झुगारून तो मुंबईत येऊन डोसाची भेट घेण्याच्या विचारात होता. मात्र त्याआधीच डोसाचा मृत्यू झाल्याने सज्जादने हा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला.

पसार झाल्यानंतर घरी गेलेल्या सज्जादला कुठेही जा, पण मुंबईत जाऊ नकोस, रमजानच्या महिन्यात तर नकोच नको, अशी शपथ त्याच्या आईने त्याला घातली होती. अ‍ॅड. पल्लवी पुरकायस्थ यांची हत्या सज्जादकडून घडली होती. रमजानच्या काळात पोलीस बंदोबस्त जास्त असतो, असे आईने त्याला बजावले होते.

दरम्यान अ‍ॅड. पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणात मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाल्याने आरोपी सज्जाद मुघलने पॅरोल मिळवून पसार व्हायचे असा कट नाशिक कारागृहात पक्का केला होता. मी परत येणार नाही, असे सांगत सज्जादने कारागृहातील जिवलग कैद्याचा निरोप घेतला होता, अशी माहितीही विशेष पथकाच्या चौकशीतून पुढे आली आहे. पसार झालेल्या सज्जादचा शोध विशेष पथकाने नाशिक कारागृहातील सहकैद्यांच्या चौकशीतून सुरू केला. कारागृहात सहकैदी कुटुंबापेक्षा जवळचे होतात. रक्ताच्या नात्यापेक्षा हे नाते घट्ट असते. हे समीकरण लक्षात असल्याने विशेष पथकाने सर्वप्रथम सहकैद्यांकडे विचारपूस केली. त्यातून कारागृहातून कायमचा पळ काढण्यासाठी सज्जादने पॅरोलसाठी धडपड सुरू केली असल्याची माहिती त्याला पुन्हा अटक केल्यानंतर समोर आली आहे. १० ते १५ वर्षांची शिक्षा झाली असती तर ती निमूटपणे भोगली असती; पण मृत्यूपर्यंत कारागृहात सडणार हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. काही करून कारागृहाबाहेर पडणे आवश्यक होते. त्यासाठी पॅरोल मिळवणे आवश्यक होते, असे सज्जादने परतीच्या प्रवासात विशेष पथकाला सांगितले.

अटक टाळण्यासाठी प्रयत्न

’इतक्या लांब, प्रतिकूल परिस्थितीत पोलीस पाकिस्तान सीमेवरील उरी तालुक्यात पोहोचणे अशक्य आहे, यावर सज्जाद ठाम असला तरी अटक होऊ नये त्यासाठी त्याने विशेष काळजी घेतली होती. उरीतल्या सलामाबाद गावात स्वत:च्या घरी वास्तव्य करणे त्याने टाळले. तिथून चार किलोमीटर अंतरावरील बहाड गावात चुलत्याकडे, जिल्ह्य़ातील अन्य नातेवाईकांकडे, जबाड या पहाडी भागात तो काही दिवस राहिला. एका ठिकाणी राहिल्यानंतर तो ती जागा बदलत असे. अटक झाल्यापासून त्याने भ्रमणध्वनी वापरणे बंद केले होते. तो सार्वजनिक दूरध्वनी केंद्राचा वापर करून कुटुंबाला चुकून एखादा दूरध्वनी करत असे.

गेल्या महिन्यापासून ‘सोनमर्ग’ या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी बोगदा खोदून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पात महिन्याला १५ हजार रुपये मजुरी, बर्फ पडत असताना काम केल्यास मजुरी दुप्पट, नियमित सुट्टय़ा, राहण्याची व्यवस्था असल्याने गेल्या महिन्यात सज्जाद तिथे कामगार म्हणून रुजू झाला. हा प्रकल्प किमान सात ते आठ वष्रे चालेल असा त्याचा अंदाज होता. सोनमर्गजवळील गगनगीर गावात रस्ता खणण्याचे काम तो करत होता.