प्राथमिक तपासातून पोलिसांचा निष्कर्ष

चार्टर्ड अकाउंटिंग, ऑडिटिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित विकमशी घराण्याची कन्या पल्लवी(२१) हिने चालत्या लोकलमधून उडी घेत आत्महत्या केली, या निष्कर्षांवर पोलीस पोहोचले आहेत. पल्लवीने कोणत्या परिस्थितीत हे टोकाचे पाऊल उचलले याबाबत पुढील चौकशी व तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे. प्राधान्याने पोलीस पल्लवीचा मोबाइल फोन शोधत आहेत. तसेच आत्महत्येच्या दिवशी ती फोनवर कोणाकोणाशी बोलली याची माहिती पोलिसांनी मागवली आहे.

पल्लवीच्या अपघाती मृत्यूची नोंद राज्य रेल्वे पोलिसांनी घेतली होती. मात्र त्याआधी ती हरवल्याची तक्रार विकमशी कुटुंबाने माता रमाबाई आंबेडकर मार्ग(एमआरए) पोलीस ठाण्यात केली होती. आत्महत्येपूर्वी ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून लोकल पकडताना दिसली होती. त्यामुळे पुढील तपास एमआरए मार्ग पोलिसांनी हाती घेतला आहे. उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांच्या देखरेखीत तपास होणार आहे. चौकशी, तपास सुरू केल्याच्या वृत्ताला शर्मा यांनी दुजोरा दिला. प्राथमिक तपासातून ही आत्महत्या आहे, हे स्पष्ट होते. शुक्रवारी पल्लवीच्या नातेवाईकाचा जबाब नोंदवण्यात आला. या घटनेने कुटुंब, जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार जबर धक्क्यात असल्याने येत्या दिवसांमध्ये या सर्वाचे जबाब नोंदवण्यात येतील, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

बुधवारी साडेसहाच्या सुमारास पल्लवीने वहिनीच्या मोबाइलवर ‘नो वन इज रिस्पॉन्सिबल’ असा संदेश धाडला. नंतर तिने मोबाइल बंद केला. पुढे करीरोड- परळ स्थानकांदारम्यान लोकलखाली चिरडून पल्लवीचा मृत्यू झाला. या संदेशासोबत बुधवारी पल्लवी पर्स आणि अन्य वस्तू मागे ठेवून फक्त मोबाइल घेत घराबाहेर पडली. यावरून ही आत्महत्याच आहे हे पोलिसांचे ठाम मत आहे.

एरवी सकाळी विलेपार्ले येथील प्रवीण गांधी विधि महाविद्यलयात शिक्षण आणि दुपारी बेलॉर्डपिअर येथील लॉ फर्ममध्ये काम(इंटर्नशिप) हा परळच्या कल्पतरू अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पल्लवीचा दिनक्रम होता.

पोलीस तिच्या मोबाइलचाही शोध घेत आहेत. मोबाइल सापडल्यास तिने समाजमाध्यमांवरून काही संभाषण केले आहे का याची माहिती पोलिसांना मिळू शकेल.