22 November 2019

News Flash

वाडिया रुग्णालयात बालकांसाठी पॅलिएटिव्ह केअर सुविधा

राज्यभरातील दुर्धर आजारांशी झगडणाऱ्या ४० रुग्णांना फायदा

बाई जेरबाई वाडिया रुग्णालय

राज्यभरातील दुर्धर आजारांशी झगडणाऱ्या ४० रुग्णांना फायदा

मुंबई : परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात कर्करोग, हृदयविकार, एचआयव्ही अशा दुर्धर आजारांनी ग्रस्त बालकांना आणि त्यांच्या पालकांना आजाराशी झगडण्याची दिशा आणि खंबीर पाठबळ देण्यासाठी खास पॅलिएटिव्ह केअर सुरू करण्यात आले आहे.

पालकांना आपले मूल दुर्धर आजारातून पूर्णपणे बरे होणे शक्य नाही, हे वास्तव स्वीकारणे फार अवघड असते. अनेकदा धक्क्य़ानेच पालक खचून जातात. या धक्क्यातून सावरून मुलाची काळजी घ्यायला शिकणे इथपर्यतच प्रवास गाठण्यासाठी पॅलिएटिव्ह केअरमध्ये (परिहार सेवा) मदत केली जाते.

वाडियातील पॅलिएटिव्ह केअरमध्ये डॉक्टरांसह परिचारिका, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ता कार्यरत आहेत. येथे सध्या राज्यभरातील ४० मुले सेवा घेत आहेत. मुलांच्या आहार आणि व्यायामाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आहारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपी डॉक्टरही आहेत. उपचारासह असह्य़ वेदनांमधून आराम पडण्यासाठी औषधे, मुलांना होणारा मानसिक, शारीरिक त्रास लक्षात घेऊन त्यावरही उपाय शोधले जातात. मुलांची घरी किंवा बाहेर वावरताना काळजी कशी घ्यावी, आपात्कालीन स्थितीमध्ये काय उपचार करावेत याची माहितीही दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे मुलांशी संवाद साधण्यासाठीही पालकांना मदत केली जाते.

औषधांमुळे निलयच्या तोंडामध्ये मोठय़ा प्रमाणात अल्सर आला होता. त्याचा खूप त्रास होत होता. तोंड धुण्यासाठीचे दिलेली जेल तोंडात घेतली की त्याला खूपच दुखायचे. त्याचा हा त्रास बघून इथल्या डॉक्टरांनी वेदना कमी करणारे असे जेल तयार करून दिले. त्यानंतर त्याला बराच आराम पडला. निलयच्या बाबांचा हा अनुभव पालकांना पॅलिएटिव्ह केअरची कशी मदत होऊ शकते हे सहजपणे उलगडून सांगतो.

घरी आणि रुग्णालयात मोफत सुविधा

रुग्णालयाबाहेर उपचार घेणाऱ्या मुलांसाठी दररोज सकाळी नऊ ते तीन वेळेत पॅलिएटिव्ह केअरचा बाह्य़विभाग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतील ज्या मुलांना येथे आणणे शक्य नाही, अशांच्या घरी जाऊनही सुविधा दिली जात आहे. हळूहळू राज्यभरातही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

सध्या ही सेवा पूर्णपणे मोफत असून अधिकाधिक पालकांनी अशा मुलांच्या संगोपनासाठी केंद्राची मदत घ्यावी, असे आवाहन  वाडियाच्या कार्यकारी अधिकारी मिनी बोधनवाला यांनी केले आहे.

First Published on June 25, 2019 4:11 am

Web Title: palliative care facility for children in wadia hospital zws 70
Just Now!
X