अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपला देशाबाहेरील कोणत्याही कंपनीशी संबंध नसल्याचे सांगत करचोरीसाठी परदेशी कंपनी स्थापन केल्याचे वृत्त फेटाळून लावले. या कामासाठी माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आला असावा, असा दावाही त्यांनी यावेळी केला. जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने भारतातील ‘द इंडियन एक्स्प्रेस’सह जगातील अनेक नामांकित माध्यमसमूहांनी काही दिवसांपूर्वी ‘पनामा पेपर्स’ प्रकरण उजेडात आणले होते.
यामध्ये परदेशातील चार शिपिंग कंपन्यांमध्ये अमिताभ बच्चन संचालक म्हणून दाखविण्यात आले होते. त्यापैकी तीन कंपन्या या बहामामध्ये होत्या. १९९३ मध्ये या कंपन्यांची स्थापन करण्यात आली. या कंपन्यांचे अधिकृत भांडवल ५ ते ५० हजार डॉलर इतके दाखविण्यात आले होते. मात्र, माझा अशा कोणत्याही कंपनीशी संबंध नसून मी कधीही या कंपन्यांचा संचालक नसल्याचे अमिताभ यांनी सांगितले. मी परदेशात खर्च केलेल्या पैशांवरील सर्व कर भरलेला आहे. याशिवाय, मी परदेशात पाठविलेले पैसे भारतीय कायद्याला धरून असल्याचे अमिताभ यांनी स्पष्ट केले.
कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य अमेरिकेतील पनामा या देशातील मोझॅक फॉन्सेका नावाच्या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची ११.५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रे उघड करण्यात आली आहेत. त्यातून जागतिक राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंत, क्रीडापटू आणि अनेक बडय़ा असामींनी आपली मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, जर्सी, बहामा आणि सेशल्स बेटे अशा कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांमध्ये स्थापन केलेल्या कंपन्यांच्यामार्फत मोठय़ा प्रमाणात पैसा कसा फिरवला गेला याबाबत थक्क करणाऱ्या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, डीएलएफचे मालक के. पी. सिंग, इंडियाबुल्सचे मालक समीर गेहलोत, गुंड इकबाल मिर्ची यांच्यासह ५०० भारतीयांचा समावेश आहे.