२५ नोव्हेंबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार

राज्यातील २६ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या २९७ पंचायत समित्यांच्या पुढील वर्षी फेब्रुवारी- मार्च दरम्यान होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी घोषित केला. त्यानुसार येत्या २५ नोव्हेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

या सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मुदत मार्च २०१७ पूर्वी मुदत संपत आहे.त्यासाठी सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी ९ सप्टेंबर पर्यंत जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक विभागांमध्ये; तर पंचायत समितीच्या गणांमध्ये विभागणी म्हणजे प्रभाग रचना करतील व त्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करतील. विभागीय आयुक्त त्यास २३ सप्टेंबर पर्यंत मान्यता देतील. ५ ऑक्टोबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला आरक्षणाबाबतची जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठीची सोडत जिल्हाधिकारी; तर पंचायत समिती गणांसाठीची सोडत तहसीलदारांच्या उपस्थितीत काढण्यात येईल. आरक्षणाबाबतचे प्रारूप १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले जाईल. त्यावर नागरिकांना २० ऑक्टोबर पर्यंत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर केले जाईल.