मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी, रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतशबाजी करीत विसर्जनस्थळांकडे निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल २४ तास सुरू होत्या. परंतु, राजकीय पक्षांसह सामाजिक, स्थानिक नेत्यांनी मिरवणूक मार्गावर भाविकांसाठी पाणपोई, नाश्ता आदीच्या निमित्ताने थेट पदपथ आणि रस्ते अडवून मंडप उभारल्याने भाविकांचे मार्ग काढताना प्रचंड हाल झाले.
या वर्षी उच्च न्यायालयाने बडगा उगारल्याने रस्ते अडवून मंडप उभारणाऱ्या गणेश मंडळांना चांगलाच चाप बसला. मात्र विसर्जनासाठी मार्गस्थ होणाऱ्या गणरायावर फुलांचा वर्षांवर करण्यासाठी हौशी नेते मंडळींनी पदपथ आणि रस्त्यांवरच मंडप उभारले होते. या मंडपांमुळे पादचारी आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पदपथावर उभ्या राहणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास होत होता.
इतकेच नव्हे तर काही मंडप मिरवणुकींनाही अडचणीचे ठरत होते. गणेश मंडळांना रस्त्यावर मंडप उभारणीस बंदी असताना राजकीय पक्ष व नेत्यांच्या या मंडपांकडे मात्र पालिका आणि पोलिसांनी काणाडोळा केला होता. याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
विसर्जनस्थळांच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. अवशी मुंबापुरी गणेशनामाच्या गजरात दुमदुमून गेली. मात्र विसर्जन मिरवणुकांमुळे विसर्जनस्थळांच्या दिशेने जाणारे आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. तसेच मिरवणुकीच्या निमित्ताने बेताल झालेल्या युवकांना आवरताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.
मुंबईतील आकर्षण स्थान बनलेला लालबाग मार्केटमधील ‘लालबागचा राजा’, गणेशगल्लीतील ‘मुंबईचा राजा’, ‘गिरगावचा राजा’ आणि ‘गिरगावचा महाराजा’च्या विसर्जन मिरवणुकीस रविवारी सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास सुरुवात झाली आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी लालबाग, गिरगाव परिसरात अलोट गर्दी केली.
त्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे बाप्पाला आवाहन करीत ठिकठिकाणाहून गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जनस्थळाच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागल्या आणि अवघी मुंबापुरी गणेशमय झाली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळांवर तब्बल ४९,८७९ गणपतींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ९,६९१ सार्वजनिक, ३९,९७८ घरगुती आणि २१० गौरींचा समावेश होता. यापैकी १७५ सार्वजनिक, २४१० घरगुती आणि सात गौरींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले.
चौपाटय़ा गर्दीने फुलल्या
मुंबईमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीचे गिरगाव, दादर, जुहू आदी प्रमुख चौपाटय़ांवर विसर्जन केले जाते. हा विसर्जन सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी लाखो भाविकांनी चौपाटय़ांवर गर्दी केली होती. भाविकांना मार्गदर्शन आणि मदतीसाठी पालिकेकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच पोलिसांनीही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. काही सामाजिक संस्थांकडूनही सुविधा आणि सुरक्षेबाबत पालिका व पोलिसांना सहकार्य करण्यात येत होते. रविवारी रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनांच्या मिरवणुका विसर्जनस्थळांच्या दिशेने मार्गस्थ होत होत्या.