प्रसाद भोसले, सिद्धेश श्रीवास्तव आणि सम्राट राणा…मुंबईतील शाळांमध्ये फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम पाहणारे हे तिघे जण एरवी पावसााच्या दिवसात आपल्या शाळेच्या संघाला प्रशिक्षण देण्यात व्यस्त असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चित्र असं काही पालटलं की या प्रशिक्षकांना घर चालवण्यासाठी रस्त्यावर येऊन भाजी विकण्यापासून ते हॉटेलमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून अशी कामं करावी लागत आहेत. प्रसाद भोसले सध्या भाजी विकतोय तर सिद्धेश श्रीवास्तवर कबाब तयार करुन विकतोय आणि सम्राट राणा मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतोय.

“फिजीकल एज्युकेशनमध्ये मी मास्टर्स डिग्री घेतली आहे. माझ्याकडे दोन पदव्या आहेत आणि सध्या मी रस्त्यावर भाजी विकतोय. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला प्रचंड लाज वाटायची. पण जेव्हा पोट रिकामं असतं आणि घरातल्या लोकांचाही तुम्हाला विचार करायचा असतो त्यावेळी या सर्व गोष्टी बाजूला पडतात. मी घराबाहेर पडून भाजीची पोती खांद्यावर घेत रस्त्यावर भाजी विकतोय.” इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना प्रसाद भोसलेने आपली कहाणी सांगितली. मार्च महिन्यात शाळेने PE, डान्स आणि संगीत शिकवणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरुन काढलं. सध्या तुमची गरज नाही असं शाळेने सांगितल्यानंतर कांदिवलीत राहणारा प्रसाद भोसले भाजी विकत आपलं घर चालवण्याचा प्रयत्न करतोय.

सिद्धेश श्रीवास्तव मुंबईतल्या दोन शाळांमध्ये फुटबॉलचं प्रशिक्षण देऊन संध्याकाळी एका खासगी अकादमीत मुलांना शिकवायचा. शाळांना फुटबॉल प्रशिक्षक देणाऱ्या बंगळुरुतल्या एका कंपनीत सिद्धेश कामाला होता. पण लॉकडाउन सुरु झाल्यानंतर पगार देणं शक्य होणार नाही असं सांगत कंपनीने सिद्धेशला कामावरुन काढलं. “गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला पगार मिळाला नाही. आम्ही कंपनीला याबद्दल वारंवार विचारणा करतोय, पण आमचा करार रद्द झाल्याचं कारण सांगत पगार मिळणार नाही असं उत्तर आम्हाला मिळालं. माझे वडील निवृत्त आहेत, त्यामुळे परिवाराची काळजी घेण्याचं काम माझ्यावर आहे. अखेरीस मी कबाब तयार करुन विकण्यास सुरुवात केली.” सिद्धेशने आपली कहाणी सांगितली.

मुंबईतल्या CSPI या फुटबॉल अकादमीत सम्राट राणा प्रशिक्षण देतो, पण लॉकडाउन सुरु झाल्यानंतर आपलं कामही सुटल्याचं राणा म्हणाला. “मी सध्या डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. झोमॅटो, स्विगी यासारख्या कंपन्यांमध्ये जॉब आहे का हे मी तपासलं पण तिकडे जागा नव्हत्या. अखेरीस मी जवळच्या रेस्टॉरंटमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करायला सुरुवात केली. माझ्याजवळ काही रक्कम साठवली होती, ती या दिवसांत संपली. आईचे दागिने मला विकावे लागले. माझ्या भावालाही नोकरी गमवावी लागली. आम्ही तिघे भाऊ क्रीडा क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे सध्या खडतर काळातून जावं लागत असल्याचं”, राणाने सांगितलं. Mumbai School Sports Association कडे दररोज नोकरी गमवावी लागली अशा अनेक तक्रारी येत आहेत. सध्याच्या काळात अनेक शाळा क्रीडा प्रशिक्षकांना कामावरुन काढत असल्याचं समोर येतंय. यासाठी आम्ही शाळांना विनंतीही करतोय. पण सध्या स्पर्धा होत नसल्यामुळे प्रशिक्षकांची गरज नसल्याचं उत्तर शाळांकडून मिळत असल्याचं MSSA संघटनेचं म्हणणं आहे.