महाराष्ट्रातील कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या शासकीय समितीकडूनच कोटय़वधींचे घोटाळे झाल्याबाबत ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या वृत्ताची दखल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घेण्यात आली. घोटाळे होऊनही सरकार गप्प बसणार असेल तर लाखो वारकरी तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा घणाघाती हल्ला चढवत विठ्ठल मंदिर देवस्थान समितीच्या कारभारावर स्वतंत्र चर्चा करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच आठवडय़ात तीन तास चर्चा करण्याचे आश्वासनही देऊन टाकले.
विठ्ठल मंदिराची शासकीय समिती हे बडव्यांचे संस्थान बनले असून गेल्या अनेक वर्षांमधील घोटाळे, भक्तांची गैरसोय, लेखापरीक्षणाच्या अहवालांची तसेच विधी व न्याय विभागानेच दिलेल्या अहवालावर चर्चा होण्याची गरज असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. तावडे यांनी स्वतंत्र चर्चेची मागणी केली. या विषयावर मी लक्षवेधीद्वारे चर्चेची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम विभाग, नियोजन, सामाजिक व न्याय विभाग तसेच पर्यटन विभागाने हा विषय आमचा नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले.
दरम्यान, मंदिर समितीच्या ताब्यात असलेल्या गाई व खोंडांपैकी २०१०मध्ये १६ जनावरे सुमारे सत्तर हजार रुपयांना विकल्याचे माहितीच्या अधिकार उपलब्ध झालेल्या कागदपत्रांवरून दिसून येते. मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार शंभर रुपयांच्या हमीपत्रावर जनावरे न विकण्याच्या अटीने स्थानिकांना काही खोंड दिले होते.
प्रत्यक्षात खोंड विकत घेतलेल्यांकडून कोणतेही हमीपत्र न घेतल्याचेही स्पष्ट दिसते आहे.