News Flash

पं. आनिंदो चटर्जी, कौशिकी चक्रवर्ती यांच्या कलाविष्काराने रसिकांनाजिंकले!

एकल तबलावादनात ज्यांचे नाव देशभरातच नव्हे तर जगभरात आदराने घेतले जाते, ते पं. आनिंदो चटर्जी आणि अनेक ख्यातनाम गायकांच्या कौतुकाचा विषय ठरलेली शास्त्रीय गायिका कौशिकी

| January 22, 2013 03:23 am

‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘गुरुवंदना’ला उदंड प्रतिसाद
एकल तबलावादनात ज्यांचे नाव देशभरातच नव्हे तर जगभरात आदराने घेतले जाते, ते पं. आनिंदो चटर्जी आणि अनेक ख्यातनाम गायकांच्या कौतुकाचा विषय ठरलेली शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती या दोन बंगाली कलाकारांनी नुकतेच मुंबईकरांचे मन जिंकले. निमित्त होते ते ‘सूरश्री’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवंदना’ या कार्यक्रमाचे. माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमात अनोख्या कलाविष्कारामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. हा कार्यक्रम ‘लोकसत्ता’ने प्रस्तुत केला होता.
सध्याच्या पिढीतील आश्वासक स्वर म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या कौशिकी चक्रवर्ती देसिकन यांनी या मैफलीची सुरुवात केली. कौशिकीसारख्या गायिकांच्या हातात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुरक्षित आहे, अशी खुद्द पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली पावती तसेच उस्ताद विलायत खाँ, उस्ताद अल्लारखा खाँ, उस्ताद अमजद अली  खाँ, पं. हरिप्रसाद चौरासिया यांसारख्या दिग्गजांनीही कौशिकी यांच्या आवाजाचे केलेले कौतुक याची जाणीव असल्याने रसिकांमध्ये त्यांच्या गाण्याविषयी प्रचंड उत्सुकता होती. कौशिकी यांनी सुरुवातीला रागेश्री हा राग निवडला. तब्बल तासभर हा राग आळवल्यानंतर त्यांनी गुरू पं. ग्यानप्रसाद घोष यांनी शिकविलेली चीज तन्मयतेने सादर केली. या वेळी त्यांची व अजय जोगळेकर (संवादिनी) यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. अनीश प्रधान (तबला) यांनीही त्यांना उत्तम साथ केली.
कौशिकी यांच्या बहारदार गायनामुळे रंगलेल्या या वातावरणावर उत्तरार्धात पं. आिनदो चक्रवर्ती यांनी कळस चढविला. वयाच्या पाचव्या वर्षांपासून तबलावादनाचे धडे गिरविणाऱ्या व प्रथम उस्ताद अफाक हुसेन खाँ आणि त्यानंतर पंडित ग्यानप्रकाश घोष यांच्याकडे तब्बल तीस वर्षे शागिर्दी करणाऱ्या आनिंदो यांना १९९०मध्ये ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ येथे तबला वाजविण्याची संधी मिळाली. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये तबलावादन करणाचा मान प्रथम मिळविणाऱ्या कलाकाराच्या तबल्यातील जादू अनुभवण्यासाठी रसिकांनी जीवाचे कान केले होते. झपतालापासून सुरुवात करत त्यांनी या तालाचे कायदे, रेले याचे तपशीलवार सादरीकरण केले. यानंतर त्रितालही त्यांनी कायदे, रेले, चक्रधार असा चहुअंगाने रंगविला. या एकलवादनाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. पं. चटर्जी यांनीही गुरू पं. ग्यानप्रसाद घोष यांनी शिकविलेल्या रचना सादर केल्या. दीड तास रंगलेली ही मैफल संपू नये, अशी भावना रसिकांमध्ये व्यक्त होत होती.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. टांकसाळे यांच्या हस्ते पंडितजींचा सत्कार करण्यात आला. पं. चटर्जी यांचे मुंबईत खूप कमी कार्यक्रम होत असल्याने त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्याची मिळालेली ही संधी आमच्यासाठी गौरवास्पद आहे, असे मनोगत ‘सूरश्री’ या संस्थेचे अभिजीत सावंत आणि विकास दळवी यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:23 am

Web Title: pandit anido chattarjeekaushiki chakravarti win hearts of audience by musical programe
Next Stories
1 नीलमनगरमध्ये झोपडीदादांकडून मतिमंद मुलीचा विनयभंग
2 प्राप्तीकर आयुक्तांच्या गाडीच्या धडकेत महिला जखमी
3 राम कदम यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचे आश्वासन
Just Now!
X