सरकारच्या नियमानुसार राज्यातील मंत्र्यांचा वाहन ताफा रद्द झाला असून प्रत्येक मंत्र्याला एकच वाहन दिले जाते. मात्र राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या दिमतीला दोन अतिरिक्त तर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दिमतीला एका अतिरिक्त वाहनाची सोय केल्याचे माहिती अधिकारातील अर्जावर महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह आणखी कोणाकोणाला व किती वाहने पुरवली आहेत, याची माहिती मागणारा अर्ज कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला होता. त्यावर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांस दोन गाडय़ांसह तीन ड्रायव्हर दिले असून तिन्ही ड्रायव्हर कंत्राटी पद्धतीवर आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना एक गाडी दिली असून दोन्ही चालक कंत्राटी पद्धतीने आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने दिली.

सामान्य प्रशासन विभागाच्या २६ डिसेंबर २००५च्या शासन निर्णयानुसार शासकीय परिवहन सेवेतील मंत्री वाहन ताफा रद्द करण्यात आला असून मंत्रिमहोदयांना प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून देण्याचे त्यात म्हटले आहे. तरीही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत एकापेक्षा अधिक वाहने वापरत आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. तसेच वाहनांवर झालेला खर्च तसेच चालकाला दिलेला पगार याचा संपूर्ण खर्च त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी केली आहे. याबाबत पांडुरंग फुंडकर व सदाभाऊ खोत यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.