राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता नव्या मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचा कारभार हाती घेतला आहे. दरम्यान, या नव्या मंत्र्यांना मंत्रालयात नवी दालने देण्यात आली आहेत. यामध्ये कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना एकनाथ खडसेंचे दालन मिळाले आहे. जमीन गैरव्यवहारप्रकरणी झालेल्या आरोपांमुळे काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांना त्यांच्या सर्व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले बुलडाणा येथील फुंडकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे सहकारी आहेत. फुंडकर हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे. याशिवाय, खडसे यांच्या महसूल खात्याचा कार्यभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान, मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या सुभाष देशमुख, जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर आणि महादेव जानकर यांनाही मंत्रालयात दालनांचे वाटप करण्यात आले आहे. मंत्रालय प्रशासनाकडून यासंबंधीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बहुचर्चित व दीर्घकाळ लांबलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या विस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, भाजपचे जयकुमार रावल व संभाजी पाटील-निलंगेकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागली आहे. या विस्तारात सहा जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर पाच जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे.
44275db9-e84e-43d5-a99d-9eceea2ad15c