प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी प्रियकर कधी काय करतील याचा काही नेम नाही. अशाच एका घटनेत प्रेयसीवर आपली छाप पाडण्यासाठी एका प्रियकराने मुंबईच्या पबमध्ये थेट गोळीबार केला. हरयाणाच्या पाणिपत येथील एका ४० वर्षीय बिझनेसमनने अंधेरीतील एका पबमध्ये आपल्या प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी बंदुकीतून ५ ते ६ फैरी झाडल्या. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह त्याचे दोन अंगरक्षक आणि दोन मित्रांना अटक केली आहे. याशिवाय पबमधील ७ कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रेयसी (निशा) मात्र फरार असून पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत.

रविवारी रात्री अंधेरीच्या व्हीव्हीआयपी पबमध्ये ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. मात्र, पब मालकाकडून हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न झाला होता. घडलेल्या प्रकाराबाबत पबमधील कोणीही पोलिसांनी माहिती दिली नव्हती . दुसऱ्या दिवशी पोलिसांना घडलेल्या प्रकाराबाबत टीप मिळाली, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पबचा मॅनेजर अभय वाघमारे(३२) , कर्मचारी प्रयेश ठक्कर(२९), कृष्णा शेट्टी (२९), निखील ठक्कर (२९), क्रिष्णदत्ता पांडे, अशोक सिंग आणि इंद्रनारायण पांडे (३६) यांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी करुन आरोपी बिझनेसमन राकेश कालरा याला आणि त्याचे दोन अंगरक्षक महेंद्र मलिक (३२) व सोनू सरोहा(३३) यांना आणि राजेशचे दोन मित्र साहील धमीजा व मोहीत बटला(२३) यांना अटक केली. त्यांच्यावर आयपीसी कलम ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश जगदीश कालरा असं आरोपी बिझनेसमनचं नाव असून तो विवाहीत आहे. त्याच्याकडे परवाना असलेली अनेक शस्त्र असल्याचंही सांगितलं जात आहे. रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास राकेश आणि त्यांचा ग्रुप पबमध्ये आले. पबमधील कर्मचाऱ्यांना मंत्र्याचा मुलगा असल्याचं खोटं सांगितलं, आणि जर कर्मचाऱ्यांनी राकेशच्या अंगरक्षकांना शस्त्रांसह पबमध्ये जाण्याची परवानगी दिली तर एका रात्रीसाठी ५ लाख रुपये मोजण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यानंतर प्रेयसी निशाच्या वाढदिवसासाठी केक कापण्यावेळी त्यांनी बंदुकीतून ५ ते ६ फैरी झाडल्या.

पोलिसांनी त्यांच्याकडून टोयोटा फॉर्चुनर, मर्सिडिझ , ६ शस्त्र ताब्यात घेतली आहेत.शस्त्रांचा परवानगा असल्याचा दावा कालराने केला आहे, पण त्याबाबत कागदपत्र पोलिसांना तो अद्याप देऊ शकला नाही. जप्त करण्यात आलेल्या गाड्याही चोरीच्या असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.