03 December 2020

News Flash

खडसेंनंतर पंकजा यांची कोंडी

जनाधार कमी करण्यासाठी सुरेश धस यांचे महत्त्व वाढविण्याचे प्रयत्न

पंकजा मुंडे यांचा जनाधार असलेल्या ऊसतोड कामगारांच्या संघटनेत सुरेश धस यांचा शिरकाव व्हावा, यासाठी राज्यातील १६ जिल्ह्यात १०० मेळावे घेण्यास भाजपाने पत्र काढून परवानगी दिली.

भाजपच्या प्रदेश नेत्यांकडून झालेल्या कोंडीमुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाराज होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला असताना खडसेंविरोधात वापरलेली रणनीतीच पंकजा मुंडे यांच्यासाठी वापरली जात असल्याचे गेल्या काही काळात दिसून येत आहे.

गिरीश महाजन यांच्या रूपाने खडसेंविरोधात जळगाव-खान्देशात पर्याय दिला तसा सुरेश धस यांचा ऊसतोड कामगारांच्या संघटनेत शिरकाव करून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ऊसतोड कामगारांचे एकखांबी नेतृत्व ही पंकजा मुंडे यांची राजकीय-सामाजिक ताकद संपवण्याची खेळी प्रदेश भाजपने खेळल्याने अस्वस्थ झालेल्या पंकजा यांनी चक्रव्यूह भेदता येतात असा इशारा देऊन शिवाजी पार्क वर ताकद दाखवण्याचा संकल्प जाहीर के ल्याचे मानले जात आहे.

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देऊन पंकजा मुंडे यांनी स्वत:चा उल्लेख ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा केला होता. त्यानंतर फडणवीस-मुंडे यांच्यातील शीतयुद्ध रंगले. फडणवीस यांनी  विनायक मेटे यांना हाताशी धरल्याचा रागही पंकजा मुंडे यांच्या मनात होता. विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे माजी  अध्यक्ष अमित शाह प्रचाराला येऊनही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर विधान परिषदेत आमदारकी मिळावी अशी पंकजा समर्थकांची इच्छा होती; पण थेट राज्याच्या राजकारणातून गच्छंती होऊन राष्ट्रीय समितीत पाठवण्यात आले.

ऊस कामगारांच्या नेतृत्त्वाचा मुद्दा

पंकजा मुंडे यांचा जनाधार असलेल्या ऊसतोड कामगारांच्या संघटनेत सुरेश धस यांचा शिरकाव व्हावा यासाठी राज्यातील १६ जिल्ह्य़ांत १०० मेळावे घेण्यास भाजपने पत्र काढून परवानगी दिली. करोनाकाळात पंकजा मुंडे विदेशी असल्याने सुरेश धस आणि शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांनीही मेळावे घेत ऊसतोडीचा प्रश्न तापविला. त्यामुळे बीड जिल्ह्य़ातील राजकारणातील कळीचा मुद्दा असणाऱ्या ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व कोणाकडे यावरून भाजप पक्ष पातळीवर असणारी विरोधी मते चव्हाटय़ावर आली. ती बाहेर यावीत आणि त्यातूनच पंकजा यांची कोंडी करण्याची आखणी असल्याची चर्चा पंकजा समर्थकांमध्ये आहे.

पंकजा यांचा आक्रमक पवित्रा

आपल्या पक्षाकडून होणारी ही कोंडी फोडण्यासाठीच पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्ताने आक्रमक राजकीय भाषण केले. दिल्लीला पाठवल्याचा संदर्भ देत तरीही मी कु ठेही गेलेली नाही, इथेच आहे, महाराष्ट्रात-बीडमध्येच आहे, असे चक्रव्यूह भेदता येतात, अशी विधाने पंकजा यांनी केली.

राज्यातील भाजपचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने

टीके चा भडिमार करत असताना पंकजा यांनी मात्र उद्धव ठाकरे यांचा बंधू म्हणून सन्मानाने उल्लेख केला. अतिवृष्टीमध्ये दहा हजार कोटींची मदतीच्या घोषणेचेही स्वागत केले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही आदराने उल्लेख केला.

शिवसेना शिवाजी पार्कला शिवतीर्थ म्हणते हे जगजाहीर असून पंकजा यांनीही शिवाजी पार्क ऐवजी एकदा शिवतीर्थ असा शब्दप्रयोग करत तेथे मेळावा घेऊन ताकद दाखवण्याचा संकल्पही जाहीर केला. त्यामुळे आता एकनाथ खडसेंनंतर भाजपमध्ये पंकजा मुंडे अस्वस्थ असल्याचे चित्र समोर येत असून पंकजा यांनीही माघार घेण्याऐवजी दोन हात करण्याचा पवित्रा घेतल्याने भाजपतील राजकीय संघर्ष वाढणार असे दिसत आहे.

’खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर ‘माधव’ सूत्रातील एक नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, राज्यातील भाजप नेत्यांकडून त्यांचीही कोंडी केली जात असल्याचे बोलले जाते आहे.

* भाजपने बळ दिल्यानेच ऊसतोड कामगारांच्या बैठकीसही आमदार धस यांना उपस्थित राहता आले.

* ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व कोणाकडे यावरून पक्ष पातळीवर विरोधी मते चव्हाटय़ावर आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 12:15 am

Web Title: pankaja dilemma after khadse abn 97
Next Stories
1 पंकजा मुंडे- सुरेश धस यांच्यात नेतृत्वावरून संघर्ष?
2 वक्फ बोर्डच्या कारभारावर मंत्री मलिक असमाधानी
3 मराठवाडय़ात शंभर लाख टन गाळपाची शक्यता
Just Now!
X