पंकजाकडून धनंजय मुंडे यांना धक्का; पक्षांतर्गत गटबाजी राष्ट्रवादीला भोवली

परळी नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळाल्याने धनंजय मुंडे यांचे महत्त्व वाढले होते. जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा मिळाल्याने बीड जिल्ह्य़ावर धनंजय यांचेच वर्चस्व प्रस्थापित होणार असे चित्र निर्माण झाले असतानाच पक्षांतर्गत गटबाजीने घात झाला. भाजपचा अध्यक्ष निवडून आल्याने पंकजाताईंनी धनंजय यांच्यावर मात करीत परळीच्या पराभवाचे उट्टे काढले.

बीडच्या राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून पंकजा आणि धनंजय मुंडे या दोन चुलत भावंडांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असते. एकमेकांना शह देण्याकरिता दोघेही टपलेले असतात. नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळीत पंकजाताईंना मोठा धक्का दिला. याशिवाय बीड जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला चांगले यशही मिळाले.

जिल्हा परिषद निवडणुकीत ६० पैकी सर्वाधिक २५ जागाजिंकून राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्याकरिता धनंजय मुंडे यांनी सारी ताकद लावली असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. परिणामी सहा सदस्यांनी भाजपला साथ दिली. बीड जिल्हा परिषद भाजपने जिंकल्याने धनंजय मुंडे यांना मोठा फटका बसला आहे.

मुक्तवाव भोवला

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने धनंजय मुंडे यांना मुक्तवाव दिला. राज्यातील इतर मागासवर्गीयांचा चेहरा म्हणून त्यांचे नेतृत्व पुढे आणण्याचे प्रयत्न झाले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी छाप पाडली. अजित पवार यांचा वरदहस्त असल्याने मी म्हणेन तेच हे जिल्ह्य़ात बळावले. धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित या दोन विधान परिषद सदस्यांच्या कलाने जिल्ह्य़ातील पक्षाचे राजकारण सुरू झाले. त्यातून जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखा ज्येष्ठ नेता दुखावला गेला. क्षीरसागर कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण केला गेला. पक्षाच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या क्षीरसागर यांच्या पुतण्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली नाही. उलट त्याला ताकद देण्यात आली. सुरेश धस हेसुद्धा मुंडे यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज होते. त्यातून पक्षात गोंधळ वाढत गेला. धनंजय मुंडे यांच्याविरोधात पक्षात नाराजी वाढत गेली. त्याचा राष्ट्रवादीला फटका बसला आहे.

जिल्हा परिषदांमध्ये सत्तेसाठी वाट्टेल ते! अमरावतीत काँग्रेस-सेना युती

नागपूर : विदर्भातील सहा जिल्हा परिषदांपैकी भाजपकडे बहुमत असलेल्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा परिषदेचा अपवाद सोडला तर इतर चार जिल्हा परिषदांपैकी बुलढाणा व यवतमाळ येथे भाजपने सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस -राष्ट्रवादीची मदत घेतली. अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसने सेनेची तर गडचिरोलीत भाजपने राष्ट्रवादीची सत्तास्थापनेसाठी मदत घेतली.

बुलढाणा जिल्हा परिषदेत (एकूण जागा ६०) भाजप २४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता . येथे सेनेकडे ९ जागा होत्या. पण भाजपने सेनेला बाजूला सारत राष्ट्रवादी (८जागा)सोबत युती केली. अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले. कृषिमंत्री व भाजप नेते पांडुंरग फुडंकर यांचा हा जिल्हा आहे.

यवतमाळ जिल्हा परिषदेत (एकूण जागा ६१) २० जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी त्यांना बहुमतासाठी ११ जागांची आवश्यकता होती. येथे भाजपकडे १८ जागा होत्या. भाजपने सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस (११) व राष्ट्रवादी (११) आणि अपक्ष यांच्याशी युती केली. त्यामुळे काँग्रेसचा अध्यक्ष व  भाजपचा उपाध्यक्ष झाला. महसूल राज्यमंत्री व दिग्रसचे आमदार संजय राठोड यांच्याकडे या जिल्ह्य़ातील सेनेची सूत्रे आहेत.  ५९ सदस्यीय अमरावती जिल्हा परिषदेत २६ जागा जिंकून काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. येथे काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाचपैकी दोन सदस्यांची मदत घेऊन जि.प.वर पक्षाचा झेंडा फडकाविला. गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व स्थानिक आघाडीच्या मदतीने सत्ता प्राप्त केली.