धनंजय मुंडे यांना एका खासगी कार्यक्रमात एक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र या कार्यक्रमापेक्षाही लक्षात राहिली ती व्यासपीठावर घडलेली घटना. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची व्यासपीठावर गळाभेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपल्या राजकारणाची श्रेष्ठ परंपरा पाहिली. एकमेकांविरोधात सत्तेत असलो तरीही सार्वजनिक ठिकाणी राजकीय मतभेद विसरायचे असतात. मात्र  या दोघांकडूनही या आधी मागील ६ वर्षात सार्वजनिक कार्यक्रमातही अशी भेट घडली नव्हती. ती आज घडली, हे दोघेही एकमेकांकडे पाहून दिलखुलासपणे हसले. पंकजा मुंडे यांनी आपला भाऊ धनंजय मुंडे यांची राजकीय मतभेद विसरून गळाभेट घेतली. ही गळाभेट पाहणे हा उपस्थितांसाठी एक सुखद धक्काच होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

२०१२ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देऊन धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हापासूनच मुंडे घराण्यातला उभा दावा समोर आला. काका गोपीनाथ मुंडे यांना गुरु मानणारे धनंजय मुंडेंनी अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली तेव्हा बीडचे राजकारणही ढवळून निघाले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातली दरी काही दूर झालेली महाराष्ट्राने पाहिली नाही. मात्र आज मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना पुरस्कार जाहीर होताच मंचावर जाऊन त्यांची गळाभेट घेतली. हे दृश्य निश्चितच वेगळे आणि समाधानकारक होते.

चिक्की घोटाळा प्रकरणी पंकजा मुंडेंवर आरोप करणारे धनंजय मुंडे, धनंजय मुंडेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करणाऱ्या पंकजा मुंडे हे चित्र आजवर महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे. तसेच आक्रमकपणे विधानपरिषदेत आणि विधान परिषदेबाहेरही बोलणारे धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या दोघांमध्ये विस्तव जात नव्हता. मात्र मतभेदाच्या भिंती कुठेतरी पडल्याचे चित्र आज महाराष्ट्राने पाहिले. महाराष्ट्राला मुंडे कुटुंबातील बहिण-भावाची ही भेट बघायला मिळाली.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. तेव्हापासून या दोघा भावांमधला संघर्षच महाराष्ट्राने अनुभवला आहे. मात्र तब्बल सहा वर्षांनी पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांना अशा प्रकारे भेटल्या. एवढेच नाही तर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. धनंजय मुंडे यांनीही पंकजा मुंडे यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.