पदवी प्रकरणी विनोद तावडे आणि बबनराव लोणीकर हे भाजपचे मंत्री अडचणीत आले असतानाच पंकजा मुंडे यांच्यावरही २०० कोटींच्या गैरव्यवहारांचा आरोप  नवी दिल्लीत करून काँग्रेसने बुधवारी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मुंबईत काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार दाखल केली आहे. पंकजा यांच्यावर झालेल्या आरोपांमागे मुंडे विरुद्ध मुंडे वादाची किनार असून, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे चुलत बहिणीच्या मागे हात धुवून मागे लागल्याची चर्चा आहे.
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने १३ फेब्रुवारी या एकाच दिवशी २०६ कोटी रुपयांच्या खरेदीसाठी एकाच दिवशी २४ शासकीय आदेश जारी केले. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अजय माकन यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेत हा आरोप केला. मुंबईत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी, या गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. मुंडे यांच्यासह खात्याचे सचिव व अन्य अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
पंकजा मुंडे यांनी चिक्की तसेच पुस्तके खरेदीत शासकीय प्रक्रियेचे पालन केले नाही. राज्यातील अंगणवाडय़ांना शैक्षणिक साहित्य, पौष्टिक आहार व अन्य वस्तूंचा पुरवठा करताना महिला व बालविकास विभागाने नियमांचे उल्लंघन केले असून, त्यात आर्थिक फायदा झाल्याचे स्पष्ट होते, असा आरोप माकन यांनी नवी दिल्लीत केला. कोटय़वधी रुपयांची खरेदी कोणत्याही निविदा न मागविता दरपत्रकाच्या आधारे करण्यात आली होती. खरेदी आदेशाचे १३ फेब्रुवारी रोजी काढलेले आदेश शासनाच्या संकेतस्थळावर का प्रसिद्ध करण्यात आले नाहीत, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
या खरेदीच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी आपल्या निकटस्थांचा आर्थिक फायदा करून दिल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. या साऱ्या खरेदीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. खरेदी करण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूचे बाजारातील दर आणि खरेदीचे दर यात मोठय़ा प्रमाणावर तफावत असून, यातून मुंडे यांनी आर्थिक लाभ उकळल्याचा आरोप काँग्रेसने केला.

महिला व बालविकास  खात्यात मी शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. भ्रष्टाचाराला आळा घालून पारदर्शक कारभार सुरू केला. यातून काही जणांचे हितसंबंध दुखावले गेल्यानेच खोटेनाटे आरोप सुरू आहेत. मी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही.
पंकजा मुंडे</strong>

मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण
पंकजा मुंडे प्रकरणात प्रथमदर्शनी कोणताही गैरव्यवहार आढळून येत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कोणत्याही चौकशीची तयारी मुंडे यांनी दर्शविली असून काही अनुचित आढळल्यास ती करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.