मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडे यांना धक्का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागासवर्गीय समाजाच्या नेत्या व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना डावलून जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे स्वतंत्र ओबीसी खात्याचा कार्यभार सोपविला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना  फडणवीस यांनी धक्का दिल्याची चर्चा सुरु झाली असून शिंदे यांना अधिक पुढे आणण्याची भूमिका यामागे असल्याचे समजते.

ओबीसी हे स्वतंत्र खाते काही महिन्यांपूर्वी निर्माण करण्यात आले होते.  ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते म्हणूनही राज्यभरात ओळखले जात होते. पंकजा मुंडे यांनीही त्यांच्यानंतर समाजाचे नेतृत्व सांभाळले आहे. त्यामुळे हे खाते त्यांच्याकडे दिले जाणे अपेक्षित होते. पण या समाजाला न्याय देण्यासाठी हे खाते मी माझ्याकडेच ठेवणार, असे फडणवीस यांनी वाद टाळण्यासाठी त्यावेळी सांगितले होते.

मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळीजवळ भगवानगड येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. त्याच्या तीन-चार दिवस आधी फडणवीस यांनी ओबीसी खाते शिंदे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. पंकजा मुंडे यांचे जलसंधारण खातेही त्यांना अजिबात कल्पना न देता त्या परदेशात असताना काढून शिंदे यांच्याकडे देण्यात आले होते.