मोखाडा येथे सजवलेल्या ग्रामीण रुग्णालयात कृश बालकांची जमवाजमव

मोखाडा येथील सुस्तावलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या एकमजली इमारतीत सध्या लगबग सुरू आहे. रंगीबेरंगी चित्रांनी सजलेल्या िभती, चकचकीत टाइल्स, कार्पेट, कार्टुनच्या चित्रांच्या चादरी या सगळ्या वातावरणात आईच्या विटलेल्या साडीमागे दडलेल्या कृश मुलांच्या चेहऱ्यावर गोंधळल्याचे भाव दिसतात. घरी विजेचाही पत्ता नसल्याने टीव्हीवरच्या कार्टुनचे संदर्भच त्यांना लागत नाहीत. तेच गोंधळाचे भाव त्यांच्या आईच्याही चेहऱ्यावर आहेत. मातीच्या झोपडीतून थेट ‘राजवाडय़ा’त परिवर्तित झालेल्या या बदलाला कारणीभूत ठरली आहे ती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट! पालघरमध्ये कुपोषित मुलांच्या मृत्यूमुळे पसरलेल्या अस्वस्थतेवर उतारा म्हणून बालविकास मंत्री बुधवारी वाडा, मोखाडा येथे येत असल्याने ग्रामीण रुग्णालये सज्ज झाली आहेत.

मोखाडा, जव्हार, वाडा हे तालुके कुपोषणासाठी कायमच चर्चेत राहतात. मोखाडा येथे २८ ऑगस्ट रोजी सागर वाघ  आणि वाडा येथे ९ सप्टेंबर रोजी रोशनी सवरा या मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा वाडय़ामध्ये त्यांच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पेटरांजणी वस्तीत गेले होते. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांची अडवणूक करीत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी संतापलेल्या सवरा यांच्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे समस्या अधिकच चिघळली. कुपोषणाच्या संदर्भात वारंवार अर्जविनंत्या करूनही सरकार दखल घेत नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यावर सरकारदरबारी धावपळ उडाली आणि त्याचे परिणाम वाडा, मोखाडय़ातील रुग्णालयांमध्ये प्रतिबिंबित होत आहेत.

मोखाडय़ातील ग्रामीण रुग्णालयातील तळमजल्यावर लहानशा जागेत असलेले बाल उपचार केंद्र आता पहिल्या मजल्यावर नेले आहे. प्रशस्त जागेत हलवलेल्या या केंद्रात एका बाजूला दहा खाटा मांडल्या आहेत तर अधिक मुलांना सामावून घेण्यासाठी जमिनीवर आणखी १६ गाद्या टाकण्यात आल्या आहेत. आणखी मुले आल्यास अतिरिक्त गाद्यांचीही सोय आहे. सर्व गाद्यांवर कार्टुनची चित्रे असलेल्या नवीन चादरी आहेत. पांघरण्यासाठीही रंगीबेरंगी चादरींची व्यवस्था आहे. या सर्व ‘पंचतारांकित’ सुविधेचा लाभ त्यांनी किमान बुधवापर्यंत तरी घ्यावा यासाठी सर्व मुले त्यांच्या मातांसह केंद्रातच असल्याची अधूनमधून खात्री करून घेतली जाते.  पाच दिवसांपूर्वी जीपने तासाभराचा प्रवास करून सडकवाडीहून मनिषा बरब त्यांच्या चार वर्षांचा जगदीश आणि एक वर्षांची सरस्वती या दोन मुलांसह रुग्णालयात आल्या. दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळेस काही मदत मिळाली नव्हती. मुलांनाही अंगणवाडीतून काही खायला मिळाले नाही. मात्र मुलगी कुपोषित असल्याने पाच दिवसांपूर्वी इथे आणली गेली, असे सांगणाऱ्या बरब यांना आता इथे किती दिवस ठेवणार याची कल्पना नाही. चिकाडीपाडा येथील जयराम माशी यांनाही चार दिवसांपूर्वी एक वर्षांच्या मुलासह या रुग्णालयात आणले गेले. त्याची प्रसूती रुग्णालयात करावी, असे आरोग्य सेविकांनी सांगितले होते. मात्र प्रसूतीच्या वेळी अनेकदा दूरध्वनी करूनही त्या आल्या नाहीत .मुलगा घरीच जन्माला आला. आता त्याला इथे आणलेय, असे माशी म्हणाले.

आणखी २४ कुपोषित मुले त्यांच्या आईसह या विभागामध्ये राहायला आली आहेत. गेल्या चार पाच दिवसांत जमलेल्या या मुलांना दोन वेळच्या पौष्टिक जेवणासोबतच तेल, आंघोळीचा आणि कपडे धुण्याचा साबणही दिला गेला.

या मुलांना इथे आणण्यास त्यांचे पालक अनुत्सुक असतात. त्यांना इथे आणण्यासाठी आम्ही धडपडत आहोत.  रविवारी रात्री तर साडेआठ वाजेपर्यंत त्यांना समजावून इथे आणले गेले. आणखीही काही कुपोषित मुलांना इथे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्ह्य़ाधिकाऱ्यांसोबत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

सर्व कुपोषित बालकांना सकस आहार दिला जात आहे. तसेच कुपोषित मुलांची सुधारित यादीही तयार करण्याचे काम सुरू असून पुढील आठवडय़ात ती माहिती हाती येईल. त्याप्रमाणे या मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील.

–  सतीश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी

मोखाडय़ाप्रमाणेच वाडय़ातील सरकारी रुग्णालयातील चार खाटांच्या खोलीत सहा महिन्यांपूर्वी बाल उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्रात अधिक खाटांची आवश्यकता आहे, मात्र आम्ही व्यवस्थापन करून त्यानुसार मुलांना केंद्रात आणून १४ दिवस ठेवतो आहोत.

–  डॉ. प्रदीप जाधव, अधीक्षक, वाडा रुग्णालय