अशा मागण्यांनी तपासावर नकारात्मक परिणाम होण्याचा न्यायालयाचा इशारा

मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत नाराज असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी तपास अधिकारी बदलण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे. या तपास अधिकाऱ्याकडून केला जाणारा तपास समाधानकारक नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. मात्र अशा मागण्यांमुळे तपासावर नकारात्मक परिणाम होऊ शकेल, असा इशारा न्यायालयाने दिला.

अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या तपासाविषयी असमाधानी असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली होती. तसेच या दोन्ही प्रकरणांचा तपास हा न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी केली होती. गेल्या चार वर्षांपासून हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सीबीआय, तर पानसरे हत्या प्रकरणाचा राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) केला जात आहे.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी पानसरे यांचे कुटुंबीय तपासाबाबत असमाधानी आहे. ज्या तपास अधिकाऱ्यामार्फत हा तपास करण्यात येत आहे, त्याच्याकडून समाधानकारक तपास केला जात नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याला बदलण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर पुढील सुनावणीच्या वेळी या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने मात्र कुटुंबीयांच्या अशा प्रकारच्या मागण्यांमुळे तपासावर नकारात्मक परिणाम होऊ शकेल हे कुटुंबीयांनी लक्षात ठेवण्याचा इशारा दिला.

दरम्यान, दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आणखी ४५ दिवसांची मागणी सीबीआयतर्फे या वेळी करण्यात आली. ठाणे खाडीत या पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यात आली होती. ते शोधण्यासाठी सीबीआयने परदेशातून तज्ज्ञ पाणबुडय़ांना बोलावले आहे. लांबलेला पाऊस, चक्रीवादळे यामुळे या शोधमोहिमेला विलंब झाल्याचेही सीबीआयतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यामुळे या शोधमोहिमेसाठी आणखी ४५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली.