पनवेल ते आपटा हा कोकण रेल्वेवरील मार्ग दुहेरी झाला असून सोमवारपासून हा दुहेरी मार्ग सुरू होत आहे. त्यामुळे आता आपटा येथे प्रवाशांचा होणारा खोळंबा टळणार आहे. यापुढे आता पनवेल ते रोहा दरम्यानचा मार्ग तीन टप्प्यात दुहेरी करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेचा मार्ग पनवेलच्या पुढे संपूर्ण एकेरी असल्यामुळे दरवेळी या मार्गावरील गाडय़ांना विरूद्ध दिशेची गाडी जाईपर्यंत स्थानकातच थांबावे लागत होते. पनवेल ते रोहा दरम्यानच्या ७५ किलोमीटरचा मार्ग तीन टप्प्यांमध्ये दुहेरी करण्यात येत असून आपटापर्यंतचा १७ किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला आहे. या मार्गाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला आहे. आपटा ते पेण दरम्यानच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून २०१३ पर्यंत रोह्यापर्यंतचा मार्ग दुहेरी करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे कोकण आणि दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांची १० मिनिटे वाचणार आहेत.
कोकण रेल्वेची हद्द रोह्यापासून सुरू होत असून मध्य रेल्वेकडूनच सध्या दुहेरी मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी ४०३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सध्या दक्षिणेकडे किंवा कोकणात या मार्गावरून ५४ गाडय़ा धावतात.
 भविष्यात ही संख्या ७५ पर्यंत वाढून गाडय़ांचा वेगही ९० ते १३० पर्यंत नेणे शक्य होईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले. सध्या पनवेल ते रोहा या मार्गावर ६० किमी वेगाने गाडय़ा धावत असल्या तरी पनवेलकडे येणाऱ्या किंवा रोह्याकडे येणाऱ्या गाडय़ांना आपटा स्थानकात थांबवून दुसऱ्या गाडीचा मार्ग मोकळा करावा लागत होता. त्यामुळे आपटा स्थानकात २० ते ३० मिनिटे गाडीचा खोळंबा होत होता.  
आता आपटय़ापर्यंत दुहेरी मार्ग झाल्यामुळे हा खोळंबा होणार नाहीच आणि प्रवासाचा वेळ १० मिनिटांनी कमी होईल.