अविश्वास ठरावाच्या स्थगितीनंतर चारच दिवसांत शिंदेंविरुद्ध चक्रे फिरली

पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या विरोधात मंजूर झालेला अविश्वासाचा ठराव चारच दिवसांपूर्वी राज्य शासनाने स्थगित केला होता. पण स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दबावामुळे अखेर मुख्यमंत्र्यांचा नाइलाज झालेला दिसतो. यामुळेच अवघ्या चार दिवसांमध्ये सरकारने आपल्याच निर्णयात बदल करून आयुक्तांची बदली केली आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या गेल्या वर्षी झालेल्या पहिल्याच निवडणुकीत स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला घवघवीत यश मिळाले. सत्तेत येताच भाजपचे पदाधिकारी आणि आयुक्तांमध्ये विसंवाद निर्माण झाला. त्यातून आयुक्तांच्या बदलीची मागणी होऊ लागली. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती. मुख्यमंत्र्यांनी मात्र कोणताच निर्णय घेतला नाही. शेवटी आमदार ठाकूर यांनी आयुक्त शिंदे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार महापालिकेत ठराव मंजूर झाला.

भाजपचे मंत्री राम शिंदे यांचे बंधू असलेल्या सुधाकर शिंदे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर करण्याचे धाडस करण्यामागे आमदार प्रशांत ठाकूर यांचा बोलविता धनी कोण, अशी चर्चा सुरू झाली होती. पक्षाच्या नेत्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय आमदार ठाकूर हे धाडस करण्याची शक्यता नव्हती.

पनवेल महानगरपालिकेने आयुक्त शिंदे यांच्या विरोधात मंजूर केलेला अविश्वासाचा ठराव १२ एप्रिलला राज्य शासनाने निलंबित केला होता. महापालिकेने मंजूर केलेला ठराव स्थगित अथवा रद्दबातल करण्याचा राज्य शासनाला अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागानेच चार दिवसांपूर्वी ठराव स्थगित केला होता. मग चारच दिवसांमध्ये अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की राज्य शासनाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये शिंदे यांचाही समावेश केला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिंदे यांच्या बदलीचा विषय आमदार ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी प्रतिष्ठेचा केला होता. शिंदे हे आयुक्तपदी कायम राहिल्यास आपल्याला पुन्हा निवडून येणे कठीण जाईल, असे आमदार ठाकूर यांनी भाजप नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. कोकणात प्रशांत ठाकूर यांचा अपवाद वगळता भाजपचा एकही आमदार निवडून आला नव्हता. शेकाप, काँग्रेस असा प्रवास करून भाजपत आलेल्या ठाकूर यांचे पक्षात महत्त्व वाढले होते. पक्षाची शिबिरे किंवा अन्य कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे त्यांची नाराजी नको अधिकाऱ्याची बदली केली.

मुंढेंपाठोपाठ शिंदे

दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर केला असता, सरकारने आधी ठराव निलंबित केला होता. पण पुढे सरकारने मुंढे यांची पुण्यात परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक म्हणून बदली केली होती. आता शिंदे यांनाही मुंढे यांच्या मार्गाने जावे लागणार आहे. १९९८ मध्ये ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर केला होता, पण तत्कालीन मनोहर जोशी सरकारने तो फेटाळला होता व चंद्रशेखर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरच त्यांची बदली करण्यात आली होती.