नागोठणे-रोहा या १३ किमी अंतरातील काम शिल्लक

कोकणात जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याची मागणी गेली अनेक वर्षे सातत्याने होत असताना आता मध्य रेल्वेच्या हद्दीतील पनवेल ते रोहा या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सध्या या मार्गावरील नागोठणे ते रोहा हे १३ किलोमीटरच्या अंतरात दुपदरीकरण होणे बाकी असून डिसेंबर अखेपर्यंत हे काम पूर्ण होईल. पनवेल-पेण यांदरम्यानचे काम पूर्ण झाल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अंशत: दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कोकणात जाणारा हा रेल्वेमार्ग एकपदरी असल्याने या मार्गावर प्रचंड अडचणी उद्भवतात. या मार्गावर एखादा अपघात झाल्यास पूर्ण वाहतूक बंद पडते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या हद्दीतील पनवेल-रोहा आणि कोकण रेल्वेच्या हद्दीतील कोलाड ते ठोकूर यांदरम्यान दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ११ हजार कोटी रुपयांचा खर्चही अपेक्षित आहे. या कामाचा मध्य रेल्वेच्या हद्दीतील टप्पा पूर्णत्वास येणार आहे.

मध्य रेल्वेने पनवेल-पेण यांदरम्यान २७० कोटी रुपये खर्च करून दुपदरीकरणाचे काम पूर्ण केले आहे. तर पेण-रोहा यांदरम्यान ३७० कोटी रुपयांची तरतूद आहे. या टप्प्यातील पेण ते नागोठणे या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. आता नागोठणे-रोहा या स्थानकांदरम्यान १३ किलोमीटर अंतरात दुपदरीकरण होणे शिल्लक असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. रोह्य़ाच्या अलीकडे एका जागेचा ताबा मिळणे बाकी आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. हे काम पूर्ण झाल्यानंतर गाडय़ांच्या परिचालनात १५ मिनिटांचा फरक पडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.