३० जानेवारीला रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : मध्य रेल्वेवर पहिली सामान्य लोकल (उपनगरी रेल्वे सेवा) बोरीबंदर ते ठाणेपर्यंत धावली. आता मध्य रेल्वेवरील पहिली वातानुकूलित लोकलही ठाणे स्थानकाशी जोडली जाणार आहे. पनवेल ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावर ३० जानेवारीला वातानुकूलित लोकल धावणार असून, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी या गाडीला ‘सीएसएमटी’ येथून हिरवा झेंडा दाखवतील. ३१ जानेवारीपासून ही गाडी नियमित धावेल, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पहिल्या वातानुकूलित लोकलचे सारथ्य महिला मोटरमनकडे देण्यात येणार आहे. असे असले तरी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवताना सामान्य लोकलच्या काही फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्ववर सुरू झाली. ही लोकल सुरू करताना सामान्य लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. वातानुकूलित लोकलच्या दरदिवशी १२ फेऱ्या होताना त्यातील गर्दीच्या वेळेतील तीन ते चार फेऱ्यांनाच प्रतिसाद मिळत आहे. अन्य फेऱ्या रिकाम्याच जात असल्याने त्याला प्रतिसाद वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. हीच परिस्थिती मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलबाबतीतही होण्याची भीती अधिकारी व्यक्त करत आहेत.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. या मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल सुरू केली, तर सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द होताच प्रवाशांकडून मोठा रोष व्यक्त होऊ शकतो. याची भीती असल्यानेच ठाणे ते पनवेल मार्गावर पहिली वातानुकूलित चालवण्याचे नियोजन केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

पनवेल ते ठाणे मार्गावर धावल्यानंतर ही लोकल ठाणे स्थानकातून नेरुळसाठी धावेल आणि पुढे कारशेडला जाईल. उद्घाटनादिवशीच पहिली लोकल प्रवाशांसाठी खुली करावी की नाही, यावर मध्य रेल्वे प्रशासन चर्चा करत आहे. मात्र, ३१ जानेवारीपासून या लोकलच्या नियमित फेऱ्या होतील.

प्रवासी संघटनांच्या मागणीकडे दुर्लक्षच

पनवेल-ठाणे मार्गावर वातानुकूलित लोकलच्या १६ फेऱ्या चालवण्याचा विचार असला , तरी यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यापेक्षा कमी फेऱ्याही चालवल्या जाऊ शकतील. त्याबाबतचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र वातानुकूलित लोकल चालवताना सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द न करता वातानुकूलित लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याच्या प्रवासी संघटनांच्या मागणीकडे मध्य रेल्वे प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे.

महिलेकडे सारथ्य

पनवेल ते ठाणे पहिली लोकल चालवताना त्याचे सारथ्य महिला मोटरमनकडे देण्यात येईल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने केली होती. त्यामुळे याचा मान मध्य रेल्वेवरील कोणत्या महिला मोटरमनला मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.