तेजुकायाची ५३वी गणेशमूर्ती पर्यावरणपूरक; अनेक मंडळांचे शाडू, कागदी गणेशमूर्तीना प्राधान्य

नीलेश अडसूळ, मुंबई</strong>

पीओपीच्या मूर्तीपासून पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेत गेल्या काही वर्षांत अनेक घरगुतीबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही शाडूच्या मातीसोबत कागदी गणेशमूर्तीचा पर्याय स्वीकारत आहेत.

५३ व्या वर्षांत पदार्पण केलेला तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट यंदा २२ फु टी कागदी गणेशमूर्ती साकारणार आहे. तेजुकायाच्या परंपरेनुसार ही मूर्ती मूर्तिकार राजन झाड साकारणार असून मुंबईतील पहिला सर्वाधिक उंचीच्या कागदी गणेशमूर्तीचा मान या मंडळाने मिळवला आहे. शाडू मातीच्या मूर्ती जड आणि हाताळण्यास नाजूक असल्याने मंडळांना त्या आणणे शक्य नसते. याला पर्याय म्हणून कागदी लगद्याचा वापर करता येऊ शकतो, असे ट्रस्टचे अध्यक्ष सुशांत शिंदे यांनी सांगितले. मंडळाने दरवर्षीची पीओपीच्या सजावटीची पद्धत मोडून यंदा केवळ साध्या स्वरूपातील मंडप उभारण्याचे ठरविले आहे. काही वर्षांपूर्वी विसर्जन मिरवणुकीत मूर्ती कोसळल्याने मंडळ चर्चेत आले होते. त्यानंतर मात्र मंडळाने सामाजिक उपक्रमांतून आपली वेगळी ओळख निर्माण के ली. कागदी गणेशमूर्तीची संकल्पना यशस्वी झाल्यास पुढच्या वर्षीही अशीच पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्याचा मंडळाचा मानस आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

चौपाटय़ांवर उंच मूर्ती घेऊ न जाणे कठीण बनते. परंतु कागदी मूर्ती वजनाला अत्यंत हलकी असल्याने सोपे जाते. विशेष म्हणजे ती काही वेळातच पाण्यात विरघळायला लागते, असे मूर्तिकार राजन झाड सांगतात. कागदी मूर्तीचा उपक्रम स्तुत्य असला तरी मूर्तिकारांना सर्वच मूर्ती अशा पद्धतीने घडवणे शक्य नाही. मूर्ती सुकवण्यासाठी कडक उन्हाची गरज असल्याने यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यासाठी मंडप उभारणीची परवानगी पालिके कडून मिळत नसल्याने इतर मंडळांची इच्छा असूनही त्यांना ही मूर्ती साकारता येत नाही, अशी अडचण त्यांनी सांगितली.

दोन मूर्तिकार

कागदी गणेशमूर्ती घडवण्याचे काम गेली काही वर्षे मूर्तिकार संदीप गजाकोष आणि सागर चितळे करत आहेत. माटुंग्यातील सागर चितळे यांनी कागदापासून घडवलेली ९ फुटी गणेशमूर्ती के वळ दोन व्यक्ती सहज उचलू शकतात.

हेच त्यांच्या मूर्तीचे वैशिष्टय़

आहे. तर संदीप गजाकोष यांनी विक्रोळी आणि घाटकोपर विभागांसह मुंबईतील साधारण वीस मंडळांच्या गणेशमूर्ती घडवल्या आहेत. साधारण ५ फुटांपासून ते १५ फुटांर्पयच्या कागदी मूर्ती ते घडवतात.

गिरगावातील परंपरा जुनीच..

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीमध्ये गिरगावचा राजा आणि महाराजा यांचा आवर्जून उल्लेख के ला जातो. साधारण ३५ वर्षांपूर्वी निके द वरी लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे म्हणजेच गिरगावच्या राजाचे अध्यक्ष रामचंद्र तेंडुलकर यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती असावी अशी संकल्पना मांडली आणि ती सत्यात उतरवली. ती परंपरा आजही सुरू आहे. लाकूड, बांबू, टोपल्या, कागद, शाडू माती अशा पर्यावरणपूरक घटकांपासून ही मूर्ती साकारली जाते. गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असण्यामागे मूर्तिकार राजन पाटकर यांचा विशेष आग्रह असतो. ते सांगतात, आपण करत असलेल्या पीओपीच्या अतिरेकाचे परिणाम काही वर्षांनी आपल्याला भोगावेच लागणार आहेत. त्यापेक्षा आतापासून आपल्या उत्सवात सुधारणा के ली तर नक्कीच पर्यावरणाला हातभार लागेल.