News Flash

Parambir Singh Letter : गृहमंत्र्यांवरील आरोपांच्या पुराव्यादाखल परमबीर सिंग यांनी पत्रात दिले एसीपींचे ‘हे’ मेसेज!

परमबीर सिंग यांनी पत्रामध्ये गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपासाठी पुराव्यादाखल एसीपी पाटील यांच्यासोबतचं संभाषणच दिलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख राज्यातील वरीष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या एका पत्रामुळे अडचणीत सापडले आहेत. परमबीर सिंग यांनी हे पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं असून त्यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या पत्राती प्रत देण्यात आली आहे. “दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी सीआययूचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी दिले होते. त्यातले ४० ते ५० कोटी रुपये मुंबईतल्या १७५० बार आणि रेस्टॉरंट्समधून गोळा होऊ शकतात, असं देखील गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना सांगितलं होतं”, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे. तसेच, हे आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी एसीपी पाटील यांच्यासोबत मेसेजवर झालेलं संभाषण देखील सोबत जोडलं आहे.

परमबीर सिंग यांनी पत्रामध्ये केलेल्या दाव्यानुसार, “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी एसीपी पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना बोलावून मुंबईत असलेल्या १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून ४० ते ५० कोटी रुपये गोळा करण्याचे निर्देश दिले होते. पाटील यांनी त्याच दिवशी मला याबाबत माहिती दिली. गृहमंत्र्यांसोबत झालेली ही मीटिंग ४ मार्च रोजी झाल्याचं देखील त्यांनी मला सांगितलं”, असं परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलं आहे. याच्या पुराव्यादाखल १६ मार्च आणि १९ मार्च रोजी एसीपी पाटील यांच्यासोबत मेसेजवर झालेलं संभाषण त्यांनी पत्रासोबत दिलं आहे. त्याचा हा मराठी अनुवाद:

Parambir Singh Letter : “मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”, परमबीर सिंग यांचा आरोप!

पत्रात दिलेलं संभाषण –

मी (१६ मार्च २०२१, संध्या. ४.५९ वा) : पाटील, तुम्ही गृहमंत्र्यांना फेब्रुवारी महिन्यात भेटलात, तेव्हा त्यांनी आणि पाळंदेंनी किती बार आणि इतर आस्थापनांविषयी उल्लेख केला होता? आणि एकूण किती अपेक्षित रकमेचा त्यांनी उल्लेख केला होता?

मी (१६ मार्च २०२१, संध्या. ५.०० वा) : कृपया तातडीने सांगा.

एसीपी पाटील (१६ मार्च २०२१, संध्या. ५.१८ वा) : मुंबईतले १७५० बार आणि इतर आस्थापनं. प्रत्येकी ३ लाख रुपये. त्यांच्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याला एकूण ५० कोटी रुपयांचं कलेक्शन.

एसीपी पाटील (१६ मार्च २०२१, संध्या. ५.२३ वा) : ४ मार्चला श्री. पाळंदेंनी डीसीपी भुजबळ यांच्यासमोर हा उल्लेख केला.

मी (१६ मार्च २०२१, संध्या. ५.२५ वा) : आणि त्याआधी तुम्ही गृहमंत्र्यांना कधी भेटला होतात?

एसीपी पाटील (१६ मार्च २०२१, संध्या. ५.२६ वा) : ४ दिवसांपूर्वी हुक्का ब्रीफिंगसाठी.

मी (१६ मार्च २०२१, संध्या. ५.२७ वा) : आणि वाझे गृहमंत्र्यांना भेटले ती तारीख काय आहे?

एसीपी (१६ मार्च २०२१, संध्या. ५.३३ वा) : सर, मला नक्की तारीख माहिती नाही.

मी (१६ मार्च २०२१, संध्या. ७.४० वा) : तुम्ही म्हणालात ती तुमच्या मीटिंगच्या काही दिवस आधी झाली?

एसीपी पाटील (१६ मार्च २०२१, रात्री ८.३३ वा) : हो सर, पण ती फेब्रुवारीच्या शेवटी होती.

मी (१९ मार्च २०२१, रात्री ८.०२ वा) : पाटील, मला अजून काही माहिती हवी आहे.

मी (१९ मार्च २०२१, रात्री ८.०२ वा) : गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर वाझे तुम्हाला भेटले होते का?

एसीपी पाटील (१९ मार्च २०२१, रात्री ८.५३ वा) : हो सर, गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर वाझे मला भेटले होते.

मी (१९ मार्च २०२१, रात्री ९.०१ वा) : त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का की गृहमंत्र्यांनी त्यांना का बोलावलं होतं?

एसीपी पाटील (१९ मार्च २०२१, रात्री ९.१२ वा) : मीटिंगचा हेतू, त्यांनी मला सांगितलं की, त्याने मुंबईतल्या १७५० एस्टॅब्लिशमेंटमधून प्रत्येकी ३ लाख रुपये त्यांच्यासाठी देखील गोळा करायचे, ज्याची एकूण रक्कम ४० ते ५० कोटी होईल.

मी (१९ मार्च २०२१, रात्री ९.१३ वा) : ओह. हेच गृहमंत्र्यांनी तुम्हाला देखील सांगितलं होतं.

एसीपी पाटील (१९ मार्च २०२१, रात्री ९.१५ वा) : ४ मार्चला मला त्यांचे पीएस पाळंदे यांनी हेच सांगितलं होतं.

मी (१९ मार्च २०२१, रात्री ९.१६ वा) : हो हो. तुम्ही ४ ला पाळंदेंना भेटला होतात.

एसीपी पाटील (१९ मार्च २०२१, रात्री ९.१७ वा) : हो सर. मला बोलावलं होतं.

अनिल देशमुखांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवारांनाही माहिती होतं? परमबीर सिंग यांचा पत्रात दावा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 10:39 pm

Web Title: parambir singh letter messages with acp patil for allegations on anil deshmukh pmw 88
Next Stories
1 Parambir Singh Letter : “मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”, परमबीर सिंग यांचा आरोप!
2 अनिल देशमुखांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवारांनाही माहिती होतं? परमबीर सिंग यांचा पत्रात दावा!
3 “गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं”, परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप!
Just Now!
X