लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्याजागी कोणत्या अधिकाऱ्याची वर्णी लागते तसंच मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त होणारा अधिकारी महासंचालक दर्जाचा असेल की अतिरिक्त महासंचालक दर्जाचा असेल, याबाबत उत्सुकता होती. अखेर महासंचालक दर्जाचे परमबीर सिंह यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

परमबीर सिंह यांच्या नियुक्तीसंबंधी प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, संजय बर्वे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त पदावर सरकारने १९८८ च्या तुकडीतील परमबीर सिंह, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र, मुंबई या पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची बदलीने नियुक्ती केली आहे.

दरम्यान परमबीर सिंह यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस महासंचालक बिपिन सिंग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

संजय बर्वे यांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य सरकारने शुक्रवारी स्पष्ट केलं होतं. तसंच नायगाव पोलीस मुख्यालयात बर्वे यांच्या निरोप समारंभाची तयारीही सुरू करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा नव्या अधिकाऱ्याकडे सोपवली जाणार, हे निश्चित झालं होतं. मात्र रात्री उशिरापर्यंत नव्या आयुक्ताच्या निवडीची घोषणा न झाल्याने उत्सुकता वाढली होती.

गेल्या काही दिवसांपासून आयुक्तपदाच्या निवडीवरून तर्कवितर्काना उधाण आलं होतं. अधिकाऱ्याच्या सेवाज्येष्ठतेसोबत त्याचे कार्य, राजकीय जवळीक आदी बाबींवरून अंदाज लावले जात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांच्यासह अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ, केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून अलीकडेच महाराष्ट्रात परतलेले सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आदी अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती.