पारधी समाजातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार केली म्हणून गावाने त्या कुटुंबावरच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे या भयभीत कुटुंबाने गाव सोडले आहे. गावात त्या मुलीचे अपंग आजी-आजोबा दहशतीखाली जगत आहेत. मुलीच्या आई-वडिलांनी मुंबई गाठली आहे. आम्हाला न्याय द्या, संरक्षण द्या, या मागणीसाठी अन्यायग्रस्त मुलगी, तिचे आई-वडील, लहान भाऊ १६ दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. परंतु त्याची अद्याप कुणीही दखल घेतलेली नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील ही घटना आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून एक पारधी कुटुंब गावाच्या वेशीबाहेर राहिले. वयोवृद्ध अपंग वडील, आई, तीन भाऊ व त्यांची मुले असे हे कुटुंब आहे. लहान भाऊ मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. ५ फेब्रुवारीला तो व त्याची पत्नी बाहेर गेल्याची संधी साधून त्यांच्या अल्पवयीन मुलीवर किशोर नवले याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पालकांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना दाद दिली गेली नाही. अखेर अनेक ठाण्यांत खेटे घातल्यानंतर त्यांची तक्रार नोंदविली गेली पण त्यानंतर अख्ख्या गावाने त्यांना बहिष्कृत केले.