बुधवारी सकाळची वेळ, बकरी ईदचा दिवस असल्याने आदम मिस्त्रीत मशिदीत वर्दळ जास्त होती.. नमाज अदा केल्यावर गल्लीतील तरुण थांबले होते..इतक्यात गल्लीच्या समोरील क्रिस्टल टॉवरमध्ये आग लागल्याचे या तरुणांना समजले…क्षणाचाही विचार न करता हे तरुण इमारतीच्या दिशेने पळाले आणि मदतकार्यात स्वतःला झोकून दिले.

परळच्या क्रिस्टल टॉवरमध्ये सकाळी आग लागली असून या आगीत चार रहिवाशांचा धूरात गुदमरुन मृत्यू झाला. टॉवरमधील १२ व्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीनंतर आदम मिस्त्री गल्लीतील तरुणांनी मोलाची मदत केली. हुसैन शेख, वासिम शेख, दानिश मेहतर, अब्दुल शेख असे १० ते १५ जण आग लागल्याचे समजताच इमारतीच्या दिशेने पळाले. अग्निशमन दलाच्या पथकाला आगीची माहिती देण्यात आली होती. पथक येईपर्यंत या तरुणांनी इमारतीतील लोकांना सुरक्षित बाहेर काढायला सुरुवात केली. अग्निशमन दलाचे पथक आल्यावर या तरुणांनी त्यांना देखील मदत केली.

‘आम्ही सकाळी नमाज अदा करुन घरी परतत होते. त्यावेळी आम्हाला आग लागल्याचे समजताच. मी व माझ्या मित्रांनी १० ते १५ जणांना आम्ही बाहेर काढले’, असे हुसेन कुरेशी या तरुणाने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला सांगितले.