21 February 2020

News Flash

पूल पाडल्याने परळ, लोअर परळ कोंडीग्रस्त

सध्या परळ स्थानकाजवळील पुलाचा वापर वाढला असला तरी पावसाळ्यात मडकेबुवा चौकात अनेकदा पाणी साचते.

(संग्रहित छायाचित्र)

परळ, लोअर परळ

सुहास जोशी

वाहतुकीस धोकादायक ठरल्यामुळे लोअर परळ स्थानकाजवळील पूल पाडल्यानंतर एकूणच परळ, लोअर परळ या सर्व परिसराला वाहतूक कोंडीने घेरले आहे. पर्यायी मार्गासाठी लांबलचक फेरफटका मारावा लागत असल्यामुळे सध्या सर्वाधिक ताण परळ रेल्वे स्थानकाजवळील पुलावर पडतो आणि हा सारा परिसर ठप्प होऊन जातो.

परळ पूर्वेकडून लोअर परळ, वरळी या भागात जाण्यासाठी परळ आणि करी रोड रेल्वे स्थानकाजवळील पुलावरून जाण्याचा मार्ग अनेक वाहनचालक स्वीकारायचे. करी रोडवरून लोअर परळ आणि वरळी भागात जाण्यासाठी असलेला लोअर परळ स्थानकाजवळील ना. म. जोशी मार्गावरील पूल पाडल्यानंतर हा पर्याय पूर्णत: बंद झाला. परिणामी सर्वच वाहनचालक परळ स्थानकाजवळील पुलाचा वापर करतात. हा पूल केवळ दोन वाहनांना प्रवास करण्याइतपत रुंद आहे. पुलास जोडणाऱ्या मार्गावरून येणाऱ्या वाहनांचा लोंढा या पुलावरून जाताना साहजिकच वाहतूक कोंडी निर्माण करत आहे. ही वाहतूक कोंडी दिवसभर कायम असते. सकाळी आणि सायंकाळी घाईगर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी असह्य़ होऊन जाते. मडकेबुवा चौक ते संत रोहिदास चौक या दोन्ही ठिकाणी चारही मार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा लागतात. त्यामुळे दिवसभर चार ते पाच वाहतूक पोलीस येथे कार्यरत असतात.

सध्या परळ स्थानकाजवळील पुलाचा वापर वाढला असला तरी पावसाळ्यात मडकेबुवा चौकात अनेकदा पाणी साचते. अशावेळी पर्यायी मार्ग शोधायचा तर प्रचंड मोठा फेरा घेऊन जावे लागेल.

या मार्गावर दररोज ठाणे ते लोअर परळ प्रवास करणारे भारत शर्मा सांगतात की, यापूर्वी ते करी रोडवरून प्रवास करायचे, पूल पाडल्यामुळे परळ स्थानकाजवळील पुलाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाच्या आधीच्या सिग्नलवर रोज दोन्ही बाजूस किमान २० ते २५ मिनिटे रखडावे लागते. एकूण प्रवासात अर्धा ते पाऊण तास वाढ झाल्याचे ते सांगतात. परळ गाव येथे राहणारे राजन बागवे सांगतात की, मडकेबुवा चौकातील कोंडीमुळे वाहनांच्या रांगा अगदी हाफकीन संस्थेपर्यंत येतात.

परिणामी दादरला जाण्यासाठीही २५ ते ३० मिनिटे खर्ची पडतात. त्यामुळे भोईवाडा वगैरे अंतर्गत मार्गावरून प्रवास करावा लागतो, पण तिथेदेखील वाहतूक कोंडीअसते.

रुग्णवाहिकांची कोंडी 

या परिसरात टाटा कर्करोग रुग्णालय, वाडिया रुग्णालय आणि केईएम रुग्णालय आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना सध्या या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. सर्वच बाजूंनी कोंडी असल्यामुळे रुग्णवाहिकांना जागा मिळणे कठीण होते. त्यातच पावसाळ्यात एखादे वाहन बंद पडलेच तर अशा वाहतूक कोंडीमधून रुग्णवाहिकेला मार्ग काढणे आणखीनच कठीण ठरू शकेल. सध्याच रुग्णवाहिकांना मोठय़ा मुश्किलीने मार्ग काढावा लागत आहे.

First Published on June 21, 2019 12:23 am

Web Title: parel lower parel falling pool traffic
Next Stories
1 प्रज्ञासिंह यांची मागणी फेटाळली
2 नियोजनाअभावी राज्यात पिण्याच्या पाण्याचा सावळागोंधळ : अजित पवार
3 ‘फिक्सर’ शुटिंग मारहाण: अभिनेत्री माही गिल क्रू मेंबर्ससह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
X