आशेचा किरण

ठाणे-कल्याणच्या दिशेने अतिरिक्त गाडय़ा सोडता येणार

एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर परळमध्ये लोकल गाडय़ांसाठी टर्मिनस उभारण्याच्या योजनेला चालना मिळाली असून इथे नवीन रूळ टाकण्याचे आणि फलाट निर्मितीचे काम सुरू झाले आहे. परळ टर्मिनस पूर्णपणे सेवेत येण्यासाठी मार्च, २०१९पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या टर्मिनसमधून ठाणे, कल्याणच्या दिशेने जादा गाडय़ा सोडण्यात येतील.

एल्फिन्स्टन म्हणजे आताचे प्रभादेवी स्थानक येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर परळ, लोअर परळ, दादर येथील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा आणि त्या तुलनेत मर्यादित असलेल्या रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला. दादर रेल्वे स्थानकातील ताण कमी करण्यासाठी परळ स्थानकाचा विस्तार करण्याची योजना आहे. त्याला गेल्या वर्षी चालना मिळाली. ‘मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प’मध्ये (एमयूटीपी-२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुल्र्यापर्यंत पाचवा-सहावा मार्ग होत आहे. या मार्गावरील दळणवळण अधिक क्षमतेने होण्याकरिता परळ टर्मिनस अस्तित्वात येणे आवश्यक आहे. या मार्गासाठी ८९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ९० कोटी रुपये परळ टर्मिनससाठी राखीव आहेत. परळ टर्मिनस २०१५ साली पूर्ण केले जाणार होते. प्रत्यक्षात मात्र कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली.गेल्या काही वर्षांत पश्चिम व मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील ताण वाढला आहे. परंतु, दादर स्थानकातून अधिक गाडय़ा सोडणे शक्य नाही. त्याला पर्याय म्हणूनही परळ टर्मिनसकडे पाहिले जात आहे. परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकातही गेल्या काही वर्षांत प्रवाशांची गर्दी वाढली असून लोकल गाडय़ांसाठी सुरुवातीचे व शेवटचे स्थानक परळ झाल्यास प्रवाशांनाही दिलासा मिळेल.

 कामाची संथगती

साधारण दोन वर्षांपूर्वी परळ टर्मिनसच्या कामांना सुरुवात करण्यात आली. मात्र म्हणावी तशी गती नव्हती. परळ टर्मिनस प्रकल्पात सध्याच्या फलाटाच्या बाजूलाच एक टर्मिनस लाइन बांधली जाणार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला फलाट असतील. यातील एक नवीन फलाट जून २०१८ पासून प्रवाशांच्या सेवेत आला. पूर्वीचा एक नंबर फलाट मात्र बंद करण्यात आला आहे. येथे रूळ टाकण्याचे व इतर तांत्रिक कामे केली जात आहेत. ही कामे मार्च, २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतरच येथून ठाणे, कल्याणच्या दिशेने लोकल गाडय़ा सोडल्या जातील. वर्षभरात नवीन फलाट सुरू करण्यापलीकडे रेल्वेने काही केले नाही. हा वेग असाच कायम राहिल्यास मार्च २०१९ नंतरही परळ टर्मिनस सेवेत येईल का, असा प्रश्नच आहे.

परळ टर्मिनसची वैशिष्टय़े

* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सने या टर्मिनसचा आराखडा तयार केला आहे

* टर्मिनस आधुनिक व सर्वोत्तम असल्याचा रेल्वेचा दावा

* उन्नत बुकिंग कार्यालय व अन्य सुविधांमध्ये वाढ