निवडणुकांमुळे मुदतीआधीच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांचे संबंधित विभागांना आदेश पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परळ टर्मिनसचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी संबंधित विभागांना दिले आहेत. त्यामुळे कामाला गती मिळाली असून पुढील महिन्यात परळ टर्मिनसवरून लोकल सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दादर स्थानकावरील भार कमी करण्यासाठी आणि परळमधील गर्दीच्या नियोजनासाठी हे टर्मिनस मार्च २०१९ पर्यंत सेवेत आणण्याचे उद्दिष्ट याआधी ठेवण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत दादर स्थानकावरील लोकल व प्रवाशांचा भार वाढला आहे. परळ स्थानकातही तीच परिस्थिती आहे. परळमधील सरकारी, खासगी कार्यालये, रुग्णालये तसेच लागूनच असलेले एल्फिन्स्टन रोड स्थानकामुळे परळ स्थानकावरही मोठा भार पडत आहे. हे पाहता परळ स्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प- २ (एमयूटीपी- २)मधील सीएसएमटी ते कुर्ल्यापर्यंतच्या पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम सुरू असून याच प्रकल्पात परळ टर्मिनस प्रकल्प पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले. परळ टर्मिनस ९० कोटी रुपये खर्च करून २०१५ सालीच पूर्ण केले जाणार होते. प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. प्रकल्पात पूर्वी अस्तित्वात असलेल्या फलाट क्रमांक एकच्या बाजूलाच एक टर्मिनसचा मार्ग बांधण्यात आला असून त्याच्या दोन्ही बाजूला फलाट आहे. यातील एक नवीन फलाट जून २०१८ पासून प्रवाशांच्या सेवेत आला आहे. पूर्वीचा फलाट क्रमांक एक बंद करण्यात आला असून तिथे परळ लोकल टर्मिनसचे काम सुरू आहे. हे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करून परळ लोकल सोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते; परंतु पुढील वर्षांत होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका पाहता परळ टर्मिनस मुदतीआधीच पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी संबंधित विभागांना डिसेंबर २०१८ पर्यंत टर्मिनसचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर त्वरित जानेवारी महिन्यापासून याच टर्मिनसमधून डाऊन दिशेला लोकल सोडण्याचे नियोजनही केले जात आहे. १०-१२ फेऱ्यांचे नियोजन दादर स्थानकातून ठाणे, कल्याण दिशेला सुटणाऱ्या काही लोकल फेऱ्या परळ स्थानकातून सोडण्याचे नियोजन आहे. जवळपास दहा ते बारा फेऱ्यांचा परळ लोकलसाठी विचार केला जात आहे.