प्रवासी सुविधांवर २८ कोटी, रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण दीड वर्षांत काम पूर्ण

मध्य रेल्वेवरील बहुप्रतीक्षित आणि बहुप्रलंबित प्रकल्प म्हणून विख्यात असलेला परळ टर्मिनसच्या कामाला अखेर येत्या जून महिन्याचा मुहूर्त काढण्यात आला आहे. उपनगरीय लाखो प्रवाशांना दिलासा देणाऱ्या या ५२ कोटींच्या प्रकल्पात २८ कोटी प्रवासी सुविधांवर खर्च केले जाणार आहेत. हे काम साधारण १८ ते २० महिन्यांत पूर्ण करणार असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून मागोवा घेतल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे आदेश मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देण्यात आले आहेत.  मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील गर्दी आणि परळ स्थानकातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मध्य रेल्वेने परळ येथून उपनगरीय गाडय़ा सुटण्याची योजना आखली होती. त्यासाठी परळ टर्मिनसचा ८० कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाबाबत दोन वष्रे काहीच निर्णय झाला नव्हता. मात्र अखेर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने या प्रस्तावाला गती मिळाली आहे.

टर्मिनससाठी काय?

  • नवीन फलाटांच्या निर्मिती, फलाटांची रुंदी १० मीटर वाढवणार, परळ स्थानकाच्या मध्यावर नवीन पादचारी पूल उभारणार, दक्षिण दिशेचा पादचारी पूल एल्फिन्स्टन रोडच्या रस्ते पुलाशी जोडणार.
  • प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला आणखी एक प्लॅटफॉर्म बांधून त्या मार्गावर परळ लोकल येण्याची व्यवस्था. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाडय़ा एल्फिन्स्टन रोडच्या बाजूला टाकण्यात येणाऱ्या नव्या माíगकेवरून जातील.
  • सध्या अस्तित्वात असलेला दादरच्या दिशेकडील पादचारी पूल पश्चिम दिशेला उतरवणार.
  • \ छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने नव्याने बांधण्यात येणाऱ्या नवीन उन्नत पादचारी पुलावर नवीन तिकीट घर सुरू करणार.
  • छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने येणारा स्कायवॉक कॅरॉल पुलाशी जोडणार.
  • यार्ड रचना आधुनिक होणार.