परळ-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पाचवी-सहावी मार्गिका २०२०मध्ये
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या (एमयुटीपी) तिसऱ्या चरणासाठी निधी मंजूर केला असला, तरी प्रत्यक्षात या योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण होणे बाकी आहे. यापैकी कुर्ला-सीएसटी पाचवी-सहावी मार्गिका या प्रकल्पातील कुर्ला-परळ यांदरम्यानच्या मार्गिका व परळ टर्मिनस हा पहिला टप्पा मार्च २०१९पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर, परळच्या पुढे मुंबईपर्यंत या मार्गिका येण्यासाठी २०२० साल उजाडणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हार्बर मार्गाचा तिढा सुटेपर्यंत पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत येणे कठीण आहे. त्यामुळेच कुर्ला-सीएसटी पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम कुर्ला-परळ आणि परळ-सीएसटी या दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात परळ टर्मिनसच्या प्रकल्पाचाही अंतर्भाव केला असून त्यासाठीच्या निविदा जाहीर झाल्या आहेत. हे काम या वर्षांच्या मध्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
त्याचप्रमाणे परळ ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका तयार करण्याचे काम त्यापुढील वर्षांत म्हणजेच २०२०मध्ये पूर्ण होईल. एमयुटीपी-२ योजनेतील या प्रकल्पांसाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेकडून ६३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.