25 February 2021

News Flash

परळ टर्मिनसच्या कामाचा नारळ अखेर फुटला

मध्य रेल्वेकरांसाठी बहुप्रतिक्षित परळ टर्मिनसचे काम अखेर सुरू झाले आहे.

मध्य रेल्वेवरील परळ स्थानक

 

पश्चिमेकडील दोन मार्गिका ताब्यात घेण्याचे काम सुरू; एक मार्गिका बुजवून नव्या फलाटांची पायाभरणी करणार

मध्य रेल्वेकरांसाठी बहुप्रतिक्षित परळ टर्मिनसचे काम अखेर सुरू झाले आहे. हे काम गणेशोत्सवानंतर सुरू करण्यात येईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले होते. त्यानुसार आता हे काम मध्य रेल्वेने सुरू केले असून लवकरच परळ स्थानकात नव्या प्लॅटफॉर्मची पायाभरणी करण्याचे कामही सुरू होणार आहे.

कुर्ला ते सीएसटी यांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून परळ टर्मिनस बांधण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. या टर्मिनसच्या बांधकामासाठी अंदाजे ५१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी परळ येथील ‘रूट रिले इंटरलॉकिंग’ इमारत हलवण्याचे काम याआधीच मध्य रेल्वेने पूर्ण केले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही परळ टर्मिनसच्या या कामाला प्राधान्य देत मध्य रेल्वेला आदेश दिले होते.

काय काय कामे?

  • परळ स्थानकाचे परळ टर्मिनस करण्यासाठी सध्या कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या पश्चिम दिशेला फलाट उभारण्यात येईल.
  • त्यानंतर ही मार्गिका मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेला बंद केली जाईल. त्यामुळे ही मार्गिका टर्मिनल मार्गिका म्हणून काम करेल.
  • सध्या मध्य व पश्चिम रेल्वेच्या मध्ये असलेल्या चार मार्गिकांपैकी दुसऱ्या मार्गिकेला सध्याच्या कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेशी दोन्ही बाजूंनी जोडण्यात येईल. ही मार्गिका भविष्यात डाऊन धिमी मार्गिका म्हणून काम करेल.
  • सध्या असलेल्या दोन पादचारी पुलांबरोबरच आणखी एक पूल स्थानकात मध्यभागी उभा राहणार आहे.

सध्या काय?

मध्य व पश्चिम रेल्वे यांच्या मध्ये चार मार्गिका आहेत. त्यापैकी दोन मार्गिका मालवाहतुकीसाठी वापरल्या जातात. एक मार्गिका काही गाडय़ा उभ्या करण्यासाठी आणि एक मार्गिका पश्चिम व मध्य रेल्वे यांच्यात गाडय़ांचे हस्तांतरण करण्यासाठी वापरली जाते. त्यापैकी मालवाहतुकीसाठी असलेल्या दोन्ही मार्गिका मध्य रेल्वेने ताब्यात घेतल्या आहेत. यापैकी एक मार्गिका उखडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या बाजूची मार्गिका सीएसटी तसेच दादर या दोन्ही टोकांना सध्याच्या डाऊन धिम्या मार्गिकेशी तात्पुरती जोडली जाईल. भविष्यात दादर स्थानकात पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम झाल्यानंतर ती नव्या मार्गिकेशी जोडली जाईल.

लाभ कधीपासून?

फलाटांची पायाभरणी, नवीन पादचारी पुलाचे बांधकाम झाल्यानंतर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आदी गोष्टींची कामे झाल्यानंतर सहा ते आठ महिन्यांमध्ये परळ टर्मिनस प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 3:51 am

Web Title: parel terminus work started
Next Stories
1 ‘मोनोराणी’चा डिसेंबरचा मुहूर्तही हुकणार
2 ‘क्रॉफर्ड मार्केट’च्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रद्द
3 मुख्यमंत्र्यांनी पालिकेत हस्तक्षेप करू नये
Just Now!
X