शीव रुग्णालयात बेवारस सोडले, सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही मुली सुरक्षित

जयेश शिरसाट, मुंबई</strong>

अपंगत्व घेऊन जन्माला आलेल्या आणि ज्यांना धड व्यक्तही होता येत नाही, अशा दोन आणि तीन वर्षांच्या दोन लहान मुलींना पालकच शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सोडून पसार झाले आहेत. मात्र महापालिकेच्या सतर्क सुरक्षारक्षकाने या बेवारस मुलींना पुढील धोक्यापासून वाचवले. सध्या त्या बालकल्याण समितीच्या ताब्यात असून शीव पोलीस त्यांच्या पालकांचा शोध घेत आहेत.

७ जुलैला दुपारी ३ च्या सुमारास नेहमीप्रमाणे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर-कर्मचाऱ्यांची लगबग रुग्णालयात होती. तेव्हाच गेट क्रमांक एकवर तैनात महापालिका सुरक्षारक्षक नितीन भल्ला यांचे लक्ष विभाग क्रमांक १३ (औषध घेण्याच्या खिडक्यांसमोरील आवार) येथे दोन लहान मुलींवर गेले. त्यांच्या हातात बिस्किटे आणि अन्य खाद्यपदार्थ होते; पण त्यांच्या आसपास कोणीच मोठी व्यक्ती दिसत नव्हती. कदाचित मुलींचे पालक औषधे घेण्यासाठी रांगेत असावेत किंवा अन्य कुठे गेले असावेत असा अंदाज बांधून भल्ला आपल्या कामाला लागले. मात्र त्यांचे लक्ष या मुलींवर खिळून होते. तेथे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचेही जवान होते. मात्र ते रुग्णालयातून आत-बाहेर करणाऱ्यांच्या तपासणीत व्यस्त होते.

दीड तासांत या मुलींजवळ कोणीच न फिरकल्याने भल्ला यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी आपले वरिष्ठ महेश चौधरी यांना ही बाब कळवली. त्यानंतर पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी या मुलींना ताब्यात घेत संपूर्ण रुगणालयाचा आवार, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, प्रसूती विभागासह अन्य विभाग पालथे घातले. मात्र मुलींच्या पालकांचा किंवा त्यांना रुग्णालयात घेऊन आलेल्या नातेवाईकांचा कुठेच पत्ता नव्हता. अखेर पाचच्या सुमारास सुरक्षापथकाने पोलीस नियंत्रण कक्षाला बेवारस मुलींबाबत कळवले.

या दोन्ही मुलींचे नेमके वय सांगता येणार नाही, पण त्यांचे पाय वाकडे होते. त्यांना धड चालताही येत नव्हते. त्यांच्या याच अपंगत्वामुळे कदाचित पालकांनी त्यांना असे वाऱ्यावर सोडून जबाबदारी झटकली होती, पण त्यांना असेच सोडले असते तर त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किंवा मूल चोरी करणाऱ्या टोळीच्या हाती लागल्या असत्या. त्यांच्यावर कोणताही प्रसंग बेतू शकला असता, हा विचार मनात आला आणि त्यांना ताब्यात घेत पालकांचा शोधाशोध सुरू केल्याचे भल्ला यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्याकडे खूप चौकशी केली. नाव, पत्ता माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. अखेर शीव पोलीस ठाण्यातील दोन महिला शिपायांनी त्यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी मुलींच्या पालकांविरोधात भारतीय दंड संहितेतील ३१७ या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पालकांचा अद्याप शोध लागलेला नाही, अशी माहिती शीव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक ललिता गायकवाड यांनी दिली. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार यातील मोठी मुलगी तुटक तुटक बोलते. तिने आपले नाव लक्ष्मी असे सांगितले. तिचे वय तीन वर्षे असावे. तिने आपल्या बहिणीचे नाव जया असल्याचे सांगितले. जया जेमतेम दोन वर्षांची असावी, असे समजते. लक्ष्मीला पत्ता मात्र सांगता येत नाही.

पहिल्या अपंग मुलीच्या पाठीवर दुसरीही अपंग जन्माला आली. त्यामुळे पालकांनीच त्यांची

जबाबदारी झटकण्यासाठी हे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. मात्र मुलींना सोडून जाणारे त्यांचे आई-वडील आहेत की अन्य नातेवाईक आहेत, हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.