पुणे, नवी मुंबईतील आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा सूर

आईने मोबाइल हाताळण्यास मनाई केल्याने नवी मुंबईतील कोपरखरणेतील एका १४ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गेल्या गुरुवारी घडली. त्याच्या दोनच दिवस आधी पुण्यातही एका १३ वर्षीय मुलाने नेमक्या याच कारणामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांच्या पाश्र्वभूमीवर स्मार्टफोनच्या मुलांमधील अतिवेडाचे दुष्परिणाम अतिशय घातकपणे समोर येऊ लागले आहेत. मुलांना स्मार्टफोनचे ‘व्यसन’ लागण्यास पालकही जबाबदार असून त्यांना पुरेसा वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि स्वत:देखील मोबाइलचा वापर कमी करणे आवश्यक असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोपरखरणे येथील १४ वर्षीय मुलीला नाताळच्या निमित्ताने तिच्या आईवडिलांनी स्मार्टफोन घेऊन दिला होता. नाताळच्या सुट्टीत मुलीने स्मार्टफोनचा पुरेपूर उपभोग घेतला, मात्र शाळा सुरू झाल्यानंतर पालकांनी तिच्या मोबाइल वापरण्यावर र्निबध आणले. गेल्या गुरुवारी दुपारी ती शाळेतून घरी आली तेव्हा तिने आईकडे मोबाइलची मागणी केली, मात्र तिच्या आईने मोबाइल देण्यास मनाई केली. या गोष्टीचा राग आल्याने या मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असल्याची माहिती कोपरखरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी दिली.

या घटनेच्या दोनच दिवस आधी पुण्यातील धनकवडी परिसरात आठवी इयत्तेत शिकत असलेल्या एका मुलानेही याच कारणावरून आत्महत्या केली. परीक्षेचा अभ्यास करावा, यासाठी आईवडिलांनी मोबाइल वापरण्यास मनाई केल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी सतत मोबाइलवर चॅटिंग करत असल्याच्या रागातून विरारमध्ये एका व्यक्तीने आपल्या १६ वर्षीय मुलीला जाळल्याची धक्कादायक घटना घडली.

या सर्व घटनांनी किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चाललेले मोबाइलचे वेड हा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. मानसोपचार तज्ज्ञ आणि डॉक्टर आधीपासूनच मोबाइलच्या अतिवेडाच्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त करत आहेत. निद्रानाश, नैराश्य, सतत बसून राहिल्याने येणारा अतिस्थूलपणा, चंचलपणात वाढ अशा आरोग्याच्या तक्रारी स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे निर्माण होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या अतिवेडाला पालकही जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘सुरुवातीला ‘माझ्यापेक्षा त्याला जास्त मोबाइल हाताळता येतो’ अशा शब्दांत पालक आपल्या लहानग्यांचे कौतुक करत असतात. मात्र मुलांना मोबाइलचे व्यसन जडले की अचानक त्यांच्यावर र्निबध आणतात. हे चुकीचे आहे,’ असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत पंडित यांनी व्यक्त केले. मुलांच्या हातून अचानक मोबाइल काढून घेणे किंवा त्यांना अजिबात मोबाइल न देणे ही कृती घातक आहे.

त्याऐवजी तज्ज्ञ समुपदेशकाच्या सल्ल्यानुसार हे व्यसन कमी करावे, असा सल्ला डॉ. पंडित यांनी दिला. पालकांनी आपल्या मुलांना अधिकाधिक वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधणे किंवा त्यांच्यासोबत खेळणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनीही मुलांमधील घटती सहनशीलता आणि मानसिक शक्ती याबाबत चिंता व्यक्त केली. ‘नैराश्य पचवण्याची किंवा नाही ऐकण्याची सवय मुलांना राहिलेली नाही. परीक्षा, प्रेम, आईवडिलांशी होणारे मतभेद, मोबाइल यापैकी एकाही गोष्टीत मनाविरुद्ध घडले तरी मुले ते सहन करू शकत नाहीत,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

शाळा, शिकवणी, गृहपाठ यांतून मुलांना खेळण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यांची झोपही अपुरी होते. घरातल्या वडीलधाऱ्यांशी त्यांचा जास्त संवादही होत नाही. त्यामुळे भावनिक संबंध दुरावतात. भावनात्मकता न भिनली गेल्याने त्यांची मानसिक शक्ती कमी होते. जीवनशैलीमुळे मुलांची सहनशक्तीही कमी होत चालली आहे.   – डॉ. हरीश शेट्टी, बालमानसोपचारतज्ज्ञ

  • पालकांनी स्वत:ही गॅजेट्चा अतिवापर टाळावा. मुले त्यांचेच अनुकरण करतात.
  • रात्री गॅजेटचा वापर करूच नये.
  • घरात मुलांना शक्य तितका जास्त वेळ द्यावा. त्यांच्याशी संवाद साधावा.
  • मुलांशी भावनिक नाते घट्ट करण्याचा प्रयत्न करावा.
  • धकाधकीच्या जीवनशैलीत आवर्जून विरंगुळ्याचे प्रसंग निर्माण करावेत.