नववी ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरू होणार असून या निर्णयाबाबत पालक अद्यापही संभ्रमात असल्याचे सर्वेक्षणावरून दिसत आहे, मात्र शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठवण्याचीही पालकांची तयारी आहे.

राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. मुलांना शाळेत पाठवताना पालकांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. तर दुसरीकडे लस आल्याशिवाय प्रत्यक्ष वर्ग सुरू करू नयेत असाही मतप्रवाह पालकांमध्ये आहे. शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनीही पालकांना त्यांचे मत व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक जयवंत कुलकर्णी यांनी पालकांची मते सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणूून घेतली आहेत. गुगल अर्जाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, पुणे येथील जवळपास ५०० पालकांनी मत नोंदवले आहे.

ऑनलाइन शिक्षणाबाबत समाधान, पण..

गेले सहा महिने सुरू असलेल्या ऑनलाइन वर्गाबाबतचा अनुभव साधारण असल्याचे ४०.५ टक्के पालकांचे म्हणणे आहे, तर हा अनुभव चांगला असल्याचे ३३.१ टक्के पालकांनी नमूद केले आहे. हा अनुभव अतिशय चांगला असल्याचे मत मात्र १३.९ टक्के पालकांनी नमूद केले आहे. येत्या काळात प्रत्यक्ष वर्गाची जागा ऑनलाइन शिक्षण घेऊ शकणार नाही, असे पालकांना वाटत असून हा पर्याय निवडणाऱ्या पालकांचे प्रमाण ६३.२ टक्के आहे. पालकांनी ऑनलाइन शिक्षणासाठी महिन्याला साधारण ५०० रु. खर्च येत असल्याचे ५८.७ टक्के पालकांनी म्हटले आहे, तर २००० किंवा त्यापेक्षा अधिक रुपये खर्च करणाऱ्या पालकांचे प्रमाण ४ टक्के आहे.

म्हणणे काय?

* शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य असल्याचे ४६.६ टक्के पालकांचे म्हणणे आहे. निर्णय अयोग्य असल्याचे २६.९ टक्के पालकांचे म्हणणे आहे, तर सांगता येत नाही असे २६.२ टक्के पालकांनी नमूद केले आहे. शाळा सुरू करण्यासाठी ५० टक्क्यांहून अधिक पालकांनी होकार दर्शवला नसला तरी शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत संमतीपत्र देण्याची तयारी आहे.

* शाळेत जाण्यासाठी लेखी परवानगी देण्याची ५७ टक्के पालकांची तयारी आहे, तर ४३ टक्के पालकांची परवानगी पत्र देण्याची तयारी नाही. घोळक्यात करोना संसर्ग होण्याची भीती असल्यामुळे शाळेत पाठवण्याची तयारी नसल्याचे २६.३ टक्के पालकांचे म्हणणे आहे, तर शाळेला निर्जंतुकीकरण शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास भीती वाटत असल्याचे २२.२ टक्के पालकांचे म्हणणे आहे.

* शाळा आणि महाविद्यालये केव्हा सुरू व्हावीत? या प्रश्नासाठी १ जानेवारीपासून या पर्यायाला पालकांनी अधिक (३२ टक्के) पसंती दिली आहे. ३०.९ टक्के पालक डिसेंबरपासून शाळा सुरू कराव्यात या मताचे आहेत, तर २८.९ टक्के पालकांचा कल २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याकडे आहे. शाळा सुरू झाल्यानंतर समुपदेशनाची आवश्यकता असल्याचेही पालकांचे आहे. ५०.३ टक्के पालकांनी समुपदेशन असावे असे नमूद केले आहे.