संतप्त पालकांचा सवाल : शिक्षणमंत्री तरी दोन महिन्यात अभ्यास करतील का?
दोन महिन्यात ‘नीट’चा अभ्यास करणे शिक्षण मंत्र्यांना तरी शक्य आहे का.., आमच्या मुलांनी नीटच्या दबावाखाली आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण.., सरकारच्या धोरणाविषयीच्या अस्पष्टतेची शिक्षा आमच्या मुलांना का, असे अनेक प्रश्न घेऊन मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शुक्रवारी आझाद मैदानात ‘नीट’च्या अत्याचाराविरोधात अखेर आंदोलनाचे शस्त्र उगारले.
डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दाखल होण्यासाठी दोन वर्षांंपासून मुले अहोरात्र मेहनत करीत आहेत. या दोन वर्षांत मुलांनी मन लावून प्रवेश परीक्षेसाठी चिकाटीने अभ्यास केला. प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहोत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आमची मुले खचून गेली आहे, अशा शब्दात पालकांनी आपली व्यथा या वेळी मांडली. अवघ्या दोन महिन्यात सीबीएसई बोर्डाच्या पुस्तकांचा अभ्यास करणे अशक्य आहे. आमचा नीटला विरोध नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि भविष्याचा सरकारने विचार करावा असे म्हणताना मुलांचे व त्यांच्या पालकांचे अश्रू अनावर होत होते.
माझ्या मुलाला डॉक्टर व्हायचे म्हणून गेली दोन वर्षे तो दररोज दिवसाचे १० ते १२ तास अभ्यास करीत आहे. मात्र दोन महिन्यात सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासाच्या विचाराने तो खचला आहे. आता त्याला सात्वंन देणे मला कठीण जात आहे, त्याने स्वत:चे काही बरे वाईट केले तर याला जबाबदार कोण, असे म्हणत विलेपार्ले येथील अल्फा महाविद्यालयात शिकणाऱ्या योगीची आई शर्मिला खत्री ओक्साबोक्शी रडू लागल्या.
आझाद मैदान येथील आंदोलनात मुंबईतील साठे, प्रकाश, के.सी, अल्फा, रुईया अशा अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. ‘वैद्यकीय प्रवेश परीक्षा देणारी माणसे आहेत, यंत्र नाहीत’, ‘२०१६ साठी नीट नको’ अशा घोषणांचे फलक घेऊन पालकांनी ‘कुठे आहेत अच्छे दिन’ विचारत मोदी सरकारवर कोरडे ओढले.
यावेळी शिवानी दाडवे, तरण गुप्ता, अब्राहिम रंगूनवाला, आझिज हुसेन, क्षितिज पंडित या विद्यार्थ्यांनीही आम्हाला ‘नीट’ द्यायला लावणे अमानुष असल्याचे सांगितले. हा प्रश्न देशभरातील १० लाख विद्यार्थ्यांचा असल्यामुळे केंद्र सरकारने वटहुकूम काढून यावर्षीची नीट रद्द करावी, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

नीटमुळे फ्लिपकार्ट आणि क्लासेसचा बाजार
नीट परीक्षेची घोषणा झाल्यानंतर वैद्यकीय शिकवण्यांमध्ये ३० ते ४० हजारांचे दोन महिन्याचे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, तर फ्लिपकार्टवर सीबीएसई बोर्डाची पुस्तके सुमारे पाच हजारापर्यंत विकली जात आहेत. यामुळे सरकार लूट करणाऱ्या क्लासेसच्या बाजूने असल्याची शंकाही पालकांनी यावेळी व्यक्त केली.

‘नीट’ तोडग्यासाठी आरोग्यमंत्र्यांची बैठक
‘नीट’मधून तोडगा काढण्यासाठी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी (१६ मे) नवी दिल्लीत बोलाविली आहे. विद्यार्थ्यांना सक्तीतून दिलासा देण्याबाबत यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.