गणवेश, वह्य़ा-पुस्तकांच्या नावाखाली जादा शुल्क आकारण्यास विरोध
गणवेश, वह्य़ा-पुस्तकांच्या नावाखाली पालकांना लुबाडता येणार नाही, असे १३ वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने ठणकावूनही न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत पालकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या शाळांविरोधात मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक येथील पालकांनी एकत्र येऊन एल्गार पुकारला आहे. अशा नफेखोर शाळांविरोधातील अवमान याचिका दाखल करून हा लढा पालकवर्गाने आता थेट न्यायालयाच्या पातळीवरच लढायचे ठरविले आहे.
विद्यार्थ्यांना लागणारा गणवेश, वह्य़ा, पुस्तके, दप्तर आदी शैक्षणिक साहित्य ठरावीक पुरवठादार किंवा दुकानदाराकडूनच विकत घेण्याची सक्ती शाळा पालकांना करू शकत नाही. या संबंधात ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ या स्वयंसेवी संस्थेने पालकांच्या मदतीने २००३साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशावरून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट आदेश काढून शाळांना अमुक एकाच पुरवठादार किंवा दुकानदाराकडून गणवेश, पुस्तके, वह्य़ा आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांना करता येणार नाही, असे बजावले होते. परंतु, हे आदेश काढूनही गेल्या १३ वर्षांत चित्र पालटलेले नाही.
‘गणवेश, शूज, पुस्तके-वह्य़ांकरिताच नव्हे तर दप्तर, कंपास बॉक्स, पेन्सिली आदीकरिताही काही शाळा पालकांना ठरावीक पुरवठादारांकडूनच खरेदी करण्याची सक्ती करीत आहेत. काही शाळा तर तीन ते चार वेगवेगळ्या गणवेशाची खरेदी करण्याची सक्ती करीत असल्याच्या तक्रारी आहेत. वांद्रयातील एक शाळा तर नेहमीच्या दोन गणवेशांबरोबरच शिक्षक-पालक सभेकरिता एक तर क्षेत्रभेटींकरिता वेगळा अशा चार गणवेशांची खरेदी पालकांना करणे भाग पाडते. या विरोधात सातत्याने तक्रारी येत असल्याने आम्ही हा प्रश्न पुन्हा एकदा न्यायालयाच्या दरबारात मांडण्याचे ठरविले आहे,’ असे फोरमचे अध्यक्ष जयंत जैन यांनी सांगितले.
पालकांनी केवळ तोंडीच नव्हे तर त्यांना या संबंधात शाळेकडून मिळालेली पत्रे, पत्रके, पावत्या आदी पुराव्यादाखल फोरमकडे पाठवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

‘लोगो’साठी दुप्पट किंमत
शाळा सक्ती करीत असलेली पुस्तके पालकांनी बाजारातून स्वतंत्रपणे विकत घेण्याचीही चोरी आहे. कारण, या पुस्तकांवर शाळेचा लोगो नसतो. मग अशी पुस्तके मुलांना वर्गात चालणार नाहीत म्हणून सांगतात. थोडक्यात शाळेचा लोगो असलेली पुस्तके दुप्पट किमतीने आम्ही शाळेकडून घ्यावी, अशी त्यांची अपेक्षा असते, अशी तक्रार बोरीवलीतील एका प्रतिष्ठित शाळेच्या पालकाने केली. या शाळेत ६०० रुपये किमतीचे एक पुस्तक पालकांना १७०० रुपयांना विकण्यात येते.