News Flash

प्रत्यक्ष परीक्षेस पालकांचाच विरोध; आणखी सुलभीकरणाचा आग्रह

परीक्षा घेण्याचा सोपस्कार पूर्ण व्हावा यासाठी परीक्षांचे सर्वाधिक सुलभीकरण व्हावे असे पालकांना वाटते.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी रविवारी मुंबईत निदर्शने केली.

मुंबई : करोनाच्या साथीमुळे यंदा अभ्यासक्रम कमी करण्यापासून ते परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्यापर्यंत विविध उपाय योजून शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षा काहीशा सुलभ केल्या असल्या तरी विद्यार्थी आणि पालकांचे मात्र त्यावर समाधान झालेले नाही. परीक्षा अधिक सोप्या करून त्या नाममात्रच असाव्यात यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांनी पालकांच्या प्रोत्साहनाने रविवारी आंदोलन केले.

गेले वर्षभर शिक्षणव्यवस्थेला करोनाने ग्रासले आहे. गेल्या वर्षी विस्कळीत झालेले शाळांचे आणि परीक्षांचे वेळापत्रक सावरण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. वर्षभरातील स्थिती लक्षात घेऊन राज्य मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे कठोर नियम शिथिल केले. मात्र, विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील मेहनतीचे काटेकोर मूल्यांकन व्हावे, असे पालकांनाच वाटत नसल्याचे दिसत आहे. परीक्षा घेण्याचा सोपस्कार पूर्ण व्हावा यासाठी परीक्षांचे सर्वाधिक सुलभीकरण व्हावे असे पालकांना वाटते.

पालकांच्या प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांनी रविवारी लेखी परीक्षांविरोधात आंदोलन केले. परीक्षेबाबत करोना संसर्गाची भीती बाळगणाऱ्या पालकांनी मुलांना रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी मात्र पािठबा दिला. परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात किंवा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, अभ्यासक्रम ५० टक्के कमी करावा, अशा मागण्या पालकांनी केल्या आहेत.

परीक्षेसाठी करोनाची अडचण

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडून परीक्षा देणे धोकादायक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे वर्षभर ऑनलाइन वर्ग झाल्यामुळे परीक्षाही ऑनलाइनच व्हाव्यात, अशी मागणी पालक करत आहेत. मात्र रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर, त्यापूर्वी लातूर येथे विभागीय मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र पालकांनी पाठिंबा दिला.

पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करा

गेल्या वर्षी परीक्षांच्या तोंडावरच करोनाची साथ पसरल्यामुळे पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गेल्या वर्षीही रीतसर परीक्षा झालेली नाही. यंदाही पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

मागण्या काय?

’२५ गुण मिळाल्यास उत्तीर्ण करावे.

’परीक्षा ऑनलाइन घ्यावी किंवा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे.

’बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करावी.

’अभ्यासक्रम ५० टक्के कमी करावा.

’५० टक्के अंतर्गत मूल्यमापन आणि ५० टक्के बाह्य़ मूल्यमापन असे स्वरूप असावे.

’दोन विषयांची परीक्षा न देण्याची मुभा मिळावी.

’महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षेदरम्यान एका दिवसापेक्षा अधिक सुट्टी मिळावी.

राज्य मंडळाने दिलेल्या सवलती

’अभ्यासक्रमांत २५ टक्के कपात. लेखी परीक्षेसाठी अध्र्या तासाचा वाढीव वेळ.

’दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा रद्द. बारावीच्या महत्त्वाच्या प्रात्यक्षिक परीक्षा मोजक्याच प्रयोगांसाठी.

’दहावी आणि बारावी कला, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाऐवजी प्रकल्प, लेखनकाम

’लेखी परीक्षेनंतर १५ प्रात्यक्षिके आणि प्रकल्प सादर करण्यासाठी वेळ.

’परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा. विद्यार्थ्यांचे त्यांच्याच शाळेत परीक्षा केंद्र.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 2:23 am

Web Title: parents oppose ssc and hsc exam despite various measures zws 70
Next Stories
1 जन्मठेप भोगणाऱ्या पोलीस शिपायासह दोघांना अटक
2 खैरनार ते परमबीर सिंह; आरोपांचा राजकीय धुरळा
3 अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्याचे निर्देश कोणाचे?
Just Now!
X