गोराईच्या स्वामी विवेकानंद शाळेतील वाद

म्हाडाच्या मालकीच्या भूखंडावर मराठी माध्यमाची शाळा चालवण्याच्या बोलीने उभारण्यात आलेल्या गोराईतील ‘स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल’मधून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी (एसएससी) संलग्नित अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातला जात आहे. एसएससीऐवजी विद्यार्थ्यांनी ‘इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ (आयसीएसई) या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, अशी सक्ती करण्यात येत असल्याची पालकांची तक्रार आहे. याविरोधात पालकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून शालेय शिक्षण विभागाकडेही तक्रार केली आहे.

याबाबत शाळेचे प्रशासकीय अधिकारी नीलेश जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खासगी कार्यक्रमात असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर याबाबत सुनावणी सुरू असून लवकरच शाळेला नोटीस देऊ, असे पश्चिम विभागाच्या शिक्षण निरीक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

या शाळेची जागा म्हाडाच्या मालकीची आहे. मराठी माध्यमाची शाळा चालविण्याच्या अटीवर म्हाडाने ही जागा शाळेला दिली होती, परंतु मराठी माध्यमाची शाळा तर सोडाच शाळेतील एसएससीच्या वर्गाचा पर्यायही शाळा बंद करू पाहते आहे. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात म्हाडा वसाहतीत राहणारी बहुतांश कुटुंबे निम्न मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय आहेत. त्यांना याच शाळेचा आधार आहे. त्यांना परवडेल अशा शुल्करचनेत ‘राज्य शिक्षण मंडळा’चे वर्ग चालविण्याऐवजी शाळा महागडय़ा केंद्रीय शिक्षण मंडळाच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्याची सक्ती पालकांवर करत असल्याचा पालकांचा आरोप आहे.

एसएससी अभ्यासक्रमाच्या प्राथमिक वर्गाचे प्रवेश शाळेने चार वर्षांपूर्वी बंद केले. त्यामुळे सध्या शाळेत एसएससीचे इयत्ता चौथी ते दहावीचे वर्ग आहेत. प्राथमिकचे सर्व नवे प्रवेश शाळा आयसीएसई वर्गामध्येच करते आहे. आयसीएसईच्या अभ्यासक्रमाचे शुल्क चौपट जास्त असून सर्वसामान्य पालकांना परवडणारे नाही. म्हणून एसएससीचे प्रवेश व वर्ग सुरू राहावे, अशी इच्छा एका पालकांनी व्यक्त केली. यासाठी येथील पालकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजार पालकांनी यावर सह्य केल्या आहेत.

मनसेने पालकांच्या वतीने याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर तावडे यांनी घेतलेल्या सुनावणीत शाळा प्रशासनाने एसएससीचे वर्ग सुरू करण्याचे मान्य केले. तसेच, शिक्षण खात्याची परवानगी मिळण्यास पंधरा दिवसांचा अवधी लागेल. त्यांनी परवानगी दिल्यानंतर एसएससीचे प्रवेश सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र, ‘शाळेत अजूनही एसएससीचे चौथी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. तसेच, शाळेचा सांकेतिक क्रमांक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने रद्द केलेला नाही. त्यामुळे शिक्षण खात्याची परवानगी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे पश्चिम विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी शाळेला पत्र लिहून खडसावले आहे.

शाळेत शिकणारे ८० टक्के विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबांतील आहेत. राज्य शासनाचे फायदे घेऊन ही संस्था स्वत:च्या हितासाठी महागडे शिक्षण पालकांवर लादत आहे. शाळेने एसएससीचे वर्ग पुन्हा सुरू न केल्यास म्हाडाने ती जागा ताब्यात घ्यावी आणि एसएससीचे वर्ग चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थेला द्यावी.

नयन कदम, उपाध्यक्ष, मनसे