‘घराजवळ चांगली मराठी शाळा नसेल, तर इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही’, हा विचार सध्या पालकांमध्ये सर्वाधिक चर्चिला जात आहे. यावर उत्तर देताना, ‘मुलांना मराठी शाळेत पाठवू न इच्छिणाऱ्या पालकांनी दिलेले हे एक फक्त कारण आहे; चांगल्या मराठी शाळेसाठी पालकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे’, असा सूर मराठीप्रेमी पालक महासंमेलनात शनिवारी ऑनलाइन झालेल्या ‘मुलांकरिता आम्ही मराठी शाळा का निवडली ?’ या सत्रात उमटला.
‘घराजवळ चांगली मराठी शाळा नाही हा भ्रम आहे. ज्यांच्यानजीक शाळाच नाही त्यांना हा प्रश्न पडत नाही’, असे सांगतानाच एका मराठी शाळेचे संचालक मयुरेश गद्रे यांनी मुरबाड येथे एका गोठय़ात भरणाऱ्या शाळेचे उदाहरण दिले. तिथे दूरवरून पायपीट करत विद्यार्थी येतात. शाळा चांगली करणे हे पालकांचे काम आहे, असे मत गद्रे यांनी व्यक्त केले.
‘घराजवळ चांगली मराठी शाळा नाही, असे म्हणणारे पालक इंग्रजी शाळांना कोणत्या निकषांवर चांगले ठरवत असतात ?’ असा प्रश्न मनोविकार तज्ज्ञ डॉ. राजश्री देशपांडे यांनी उपस्थित केला. राजश्री यांनी आपल्या मुलांसाठी प्रतिष्ठेचे वलय नसलेल्या मराठी शाळेची निवड केली. ‘शाळा चांगल्या किंवा वाईट नसतात. पालकच मराठी शाळांकडे जात नाहीत, मग सरकारला तरी का त्यांच्याकडे लक्ष द्यावेसे वाटेल ?’ असा प्रश्न विचारतानाच ‘मराठी शाळा सुधारण्यासाठी पालकांनाच पुढाकार घ्यावा लागेल’, असे फौजदारी अधिवक्ता अॅड. जागृती गावकर यांनी सांगितले.
‘ दूरच्या मराठी शाळेत जाताना थोडा जास्त प्रवास करावा लागेल, पण पुढील आयुष्याचा प्रवास चांगला होईल’, असे मत ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे आनंद भंडारे यांनी व्यक्त केले.
वरळीहून दादरच्या शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलीचे उदाहरण त्यांनी दिले.
तुम्ही आयुष्यात यशस्वी झालात की तुमच्या शाळेला प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे एखादी शाळा चांगली असेल तरच आम्ही तिथे जाऊ, असे म्हणणे पालकांनी सोडले पाहिजे. शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण स्वत:पासून सुरुवात के ली पाहिजे.
– अतुल गुरव, उद्योजक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 20, 2020 12:23 am