प्रसाद रावकर

१ एप्रिलपासून पार्किंगसाठी १० टक्के जादा आकार

इमारतीच्या आवारात वाहन उभे करण्याची व्यवस्था नसल्यामुळे सार्वजनिक वाहनतळांवर अवलंबून असलेल्या मुंबईकरांना येत्या १ एप्रिलपासून शुल्कवाढीला सामोरे जावे लागणार आहे. सार्वजनिक वाहनतळांवर वाहन उभे करण्याच्या शुल्कात सरसकट १० टक्के वाढ करण्यात येणार आहे. मासिक पासही महागणार आहे.

दुचाकीस्वारांना एक तास वाहन उभे करण्यासाठी वाहनतळांच्या वर्गवारीनुसार अनुक्रमे १० ते २० रुपये मोजावे लागणार आहेत. पार्किंगच्या कालावधीनुसार शुल्क टप्प्याटप्प्याने वाढणार आहे.

काही वर्षांपूर्वी पालिकेने आपल्या सार्वजनिक वाहनतळांच्या धोरणात सुधारणा केली होती. मुंबईतील वाहनतळांचे वर्गीकरण करून अ, ब आणि क अशा श्रेणी निश्चित करण्यात आल्या होत्या. नागरिकांची सतत वर्दळ असलेली अत्यंत महत्त्वाची व्यापारी संकुले, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये असलेला परिसर ‘अ’ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आला. व्यापारी क्षेत्र, कार्यालयीन संकुले इत्यादी परिसर ‘ब’ श्रेणीमध्ये, तर मध्यमवर्गीय नागरिकांची गर्दी असलेली ठिकाणे वाहनतळांच्या ‘क’ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आली. या वर्गवारीनुसार वाहनतळांचे शुल्क निश्चित करण्यात आले. त्यामुळे दक्षिण मुंबईतील बहुतांश वाहनतळे ‘अ’ श्रेणीमध्ये समाविष्ट झाली आणि त्यांचे दर अन्य दोन गटांतील वाहनतळांच्या तुलनेत अधिक होते. १ एप्रिलपासून या तिन्ही  प्रकारच्या वाहनतळांच्या शुल्कात सरासरी १० टक्क्यांनी वाढ करण्यात येत आहे. मुंबईमध्ये २०१३ पूर्वी वाहनतळ शुल्क अत्यल्प होते. एक तास दुचाकी उभी करण्यासाठी दोन रुपये आणि तीन व चारचाकी वाहनासाठी १५ रुपये शुल्क घेतले जात होते. मात्र त्यानंतर या शुल्कात सुधारणा करून अनुक्रमे पाच आणि २० रुपये आकारण्यात येऊ लागले. नव्या धोरणात तर ‘अ’ श्रेणीच्या वाहनतळावर एक तास दुचाकी उभी करण्यासाठी १५ रुपये, तर तीन आणि चारचाकी वाहनासाठी तब्बल ६० रुपये घेण्यास सुरुवात करण्यात आली.

आता १ एप्रिलपासून दुचाकीसाठी २० रुपये, तर तीन आणि चारचाकी वाहनासाठी ७० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ‘ब’ श्रेणीतील वाहनतळांवर दुचाकीसाठी १५ रुपये, तर तीन-चारचाकी  वाहनांसाठी ४५ रुपये, ‘क’ श्रेणीतील वाहनतळांवर अनुक्रमे १० रुपये आणि २५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

इमारतीच्या आवारात वाहन उभे करण्यासाठी जागा नसलेल्या रहिवाशांसाठी पालिकेने मासिक पास योजना सुरू केली होती. सकाळी ८ ते रात्री ८, तसेच रात्री ८ ते सकाळी ८ अशा दोन टप्प्यांत ही योजना लागू होती. १२ तास वाहन उभे करण्यासाठी मासिक पासचे अनुक्रमे ३,९६० रुपये आणि १,९८० रुपये आकारण्यात आले. या मासिक पाससाठी १ एप्रिलपासून अनुक्रमे ४,४०० रुपये आणि २,२०० रुपये आकारण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईमध्ये मुख्य बाजारपेठा, सरकारी कार्यालयांची संख्या मोठी आहे. येथे नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. अनेक नागरिक आपली वाहने घेऊन या भागात कामानिमित्त येतात. या भागातील बहुतेक वाहनतळ ‘अ’ श्रेणीमध्ये असून या वाहनतळांवर आपली वाहने उभी करण्यासाठी पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

तीन-चारचाकीसाठी मासिक पास (शुल्क रुपयांमध्ये)

श्रेणी    स. ८ ते रा. ८   रा. ८ ते स. ८

‘अ’    ४,४००         २,२००

‘ब’    २,९७०         १,४८५

‘क’    १,५४०         ७७०

दुचाकीसाठी मासिक पास (शुल्क रुपयांमध्ये)

श्रेणी    स. ८ ते रा. ८   रा. ८ ते स. ८

‘अ’    १,८७०         ९३५

‘ब’    १,२१०         ६०५

‘क’    ६६०           ३३०