अवघ्या १८ वाहनतळांचा ताबा पालिकेकडे; त्यातही नऊ ठिकाणी कंत्राटदारांचा प्रतिसाद

मुंबईतील वाहनांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत दीडपट वाढ झाली असली तरी, ही वाहने उभी करण्यासाठीच्या जागेचा दुष्काळ मात्र कायम आहे. एकीकडे पुढच्या वर्षीपर्यंत शहरातील वाहनतळांची क्षमता तीन लाखापर्यंत वाढवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ११ हजार जागांच्या १८ वाहनतळांपैकी प्रत्यक्षात नऊच ठिकाणी कंत्राटदार शोधण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे उर्वरित वाहनतळांसाठी अटी शिथिल करण्याची तयारी पालिकेने केली आहे.

सध्या शहरात ९२ ठिकाणी वाहनतळ आहेत. यात आणखी भर पडावी यासाठी महानगरपालिकेने विकास नियंत्रण नियमावलीचा आधार घेत विकासकांना चटईक्षेत्राच्या मोबदल्यात बहुमजली वाहनतळ बांधण्याची योजना आणली होती. या योजनेला प्रतिसाद देत विकासकांनी चटईक्षेत्र वापरून मोठाले टॉवर बांधले मात्र पालिकेला वाहनतळ देण्यास चालढकल केली. अशा तब्बल ८५ वाहनतळांमधून सुमारे ७० हजार वाहनांसाठी जागा उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र गेल्यावर्षीपर्यंत १८ वाहनतळ पालिकेकडे आले. तिथे कंत्राटदार नेमण्यासाठी पालिकेने निविदाप्रक्रिया राबवल्या मात्र केवळ नऊ वाहनतळांनाच प्रतिसाद मिळाला आहे.

कलिना, वांद्रे हिल रोड, वरळी, सेनापटी बापट मार्ग, अल्टा माउंट रोड येथील पाच वाहनतळांवर कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर एल वॉर्डमधील दोन, बोरीवली व गोरेगाव येथील प्रत्येकी एक वाहनतळांबाबत लेखापालांकडून अभिप्राय आल्यावर प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. बोरीवली, दहिसर, कुलाबा, चेंबूर येथील वाहनतळांकडे कंत्राटदारांनी भरमसाठ शुल्काचे कारण देत पाठ फिरवली आहे. त्यामुळे उर्वरित वाहनतळांसाठी शुल्कात घट करून पुन्हा निविदा काढण्याची शिफारस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यात शहरातील आणखी सात वाहनतळ पालिकेकडे सुपूर्द केली जाण्याची शक्यता असून या सर्व वाहनतळांसाठी एकत्रित निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र या २५ वाहनतळांमुळे शहराच्या वाहनतळ क्षमतेत अवघ्या १३ हजारांची भर पडणार असून ८५ वाहनतळांची एकूण क्षमता ६९ हजार ५६६ आहे. हे सर्व वाहनतळा हाती आले तरी प्रत्यक्षातील गरज पाहता यामुळे अवघी २५ टक्के गरज भागणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सार्वजनिक वाहनतळ (पीपीएल) म्हणजे काय?

  • विकास नियंत्रण नियमावलीतील कलमांचा आधार घेत महानगरपालिकेने अतिरिक्त चटईक्षेत्राच्या मोबदल्यात विकासकांकडून बहुमजली वाहनतळ बांधून घेण्याचे ठरवले. मात्र अशा ८५ वाहनतळांपैकी ६८ वाहनतळ पालिकेच्या अजूनही ताब्यात आलेले नाहीत. गेल्यावर्षी यातील १८ वाहनतळ पालिकेकडे आले तर यावर्षी आणखी सात वाहनतळ पालिकेकडे येण्याची शक्यता आहे.
  • मुलुंड येथे दोन आणि अंधेरी पश्चिम, परळ, वरळी, गोरेगाव आणि भायखळा येथे प्रत्येकी एक याप्रमाणे सात वाहनतळ असतील. यामुळे आणखी २०१७ गाडय़ांसाठी जागा उपलब्ध होईल. यात दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांचा समावेश आहे.
  • उर्वरित ६० वाहनतळ पालिकेकडे हस्तांतरित झाले तरी आणखी ५६ हजार ४६३ जागा उपलब्ध होतील.
  • ८५ वाहनतळांमुळे शहरात एकूण ६९ हजार ५६६ जागा उपलब्ध होतील. मात्र शहरासाठी २०१९ पर्यंत तब्बल २ लाख ८४ हजार वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याची गरज असल्याचे वाहतूक आराखडय़ात नमूद केले आहे. २०३४ पर्यंत ही गरज ५ लाख ३७ हजारापर्यंत जाईल.